कोविड काळातही मानव संसाधन निर्मितीवर भर - मुख्यमंत्री सावंत

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पनेखाली केवळ बेरोजगारांनाच नव्हे, तर विशेष मुले किंवा  कुटुंबांना प्रोत्साहन देवून त्यांना उद्योग वा अन्य क्षेत्रात पुढे आणले, तर स्वयंपूर्ण राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी निश्‍चितच मदत होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पंचायती वा समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

 

डिचोली : ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पनेखाली केवळ बेरोजगारांनाच नव्हे, तर विशेष मुले किंवा  कुटुंबांना प्रोत्साहन देवून त्यांना उद्योग वा अन्य क्षेत्रात पुढे आणले, तर स्वयंपूर्ण राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी निश्‍चितच मदत होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पंचायती वा समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

गोविंदनगर-सर्वण येथील दिव्यांग सिध्दार्थ नाईक यांच्या ‘लईराई क्रिएशन’ या फाईल मॅन्युफॅक्‍चरींग युनिटचे शुक्रवारी सकाळी उद्‌घाटन केल्यानंतर छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. विद्यार्थ्यांना कुशल शिक्षण किंवा उच्च ज्ञान मिळावे यासाठी कोविड महामारी काळातही आवश्‍यक मानव संसाधन निर्मितीसाठी सरकारने भर दिला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज सामान्य युवक व्यवसाय करण्याचे धाडस करीत नाही. अशावेळी दिव्यांग सिध्दार्थ नाईक यांनी सुरू केलेला व्यवसाय हे आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून समाजासाठी आदर्शव्रत असे उदाहरण आहे. दिव्यांग मुलांना समाजातील प्रत्येक घटकाने पाठिंबा द्यावा. सिध्दार्थपासून समाजातील अनेक युवकांनी प्रेरणा घ्यावी. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेंतर्गच्या योजनांचा लाभ घेवून आत्मनिर्भर बनावे, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. 

पर्वरी येथील संजय स्कूलच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या युनिटच्या उद्‌घाटन सोहळ्यास संजय स्कूलचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर, सदस्य सचिव नितल आमोणकर, मुख्याध्यापक टी. कुडाळकर, शिक्षकवर्ग, सिध्दार्थची आई दीप्ती, भाऊ दीप नाईक, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर आणि हितचिंतक उपस्थित होते. नामफलकाचे अनावरण आणि दीप प्रज्वलन करून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या युनिटचे उद्‌घाटन केले. गुरुप्रसाद पावसकर यांनी स्वागत केले.  सूत्रसंचालन दुर्गेश माजीक यांनी केले, तर श्री. कुडाळकर यांनी आभार 
मानले.

‘लवकरच बी. एड. कॉलेज’
दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती करता यावी. यासाठी संजय स्कूलला बी. एड. कॉलेजसाठी सरकारने मान्यता दिली आहे. वास्को येथे लवकरच हे कॉलेज सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुप्रसाद नाईक यांनी यावेळी दिली. दिव्यांग सिध्दार्थ नाईक यांनी सुरू केलेला हा प्रकल्प राज्यातील पहिला प्रकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या