‘अनलॉक’मध्ये गाफिल राहू नका!

दैनिक गोमन्तक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

कोविडपासून आपला बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करायलाच हवे. किमान लस येईपर्यंत तरी जबाबदारीने नियमांचे पालन करा, गाफील राहू नका.

कोरोनामुळे उद्‍भवलेल्‍या अभूतपूर्व परिस्थितीमुळे यंदा सणवार, उत्सव, समारंभ केव्हा आले, गेले आणि ऑनलाईन साजरे झाले हे कळलेच नाही. ऑनलाईनमुळे सर्व काही घरात आले, वर्क फ्रॉम होम झाले, पण त्याचा आस्वाद काही, कोणालीही घेता आली नाही. शाळेत न जाताही, ज्ञानदानाचे कार्य सुरू झाले, घरापर्यंत ज्ञान पोहोचले, पण प्रत्यक्ष शिक्षणाची गोडी काही निर्माण झाली. देवपूजाही ऑनलाईनच झाली. सर्व काही ऑनालईन, आभासी पद्धतीने झाले. कालचक्र सुरू करण्याचा प्रयत्न शासन व इतरांनी केला. पण, अद्याप कोणत्याही क्षेत्राला गती आलेली नाही. गतीने काम होण्यासाठी आपल्याला आणखी सहा महिने लागणार आहेत.

त्यामुळे कोणीही घाबरून गप्प बसण्यात अर्थ नाही. कोणीही, कोणासाठी कोविड काळातही थांबत नाहीत. प्रत्येकजण पुढे धावत आहे. गती धरण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येकाला गरज आहे, जगण्याची. आपले अर्थचक्र सुरू करण्याची. त्यामुळेच मालकांपासून कर्मचाऱ्यांपर्यत आणि शासन व्यवस्थेतील सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वांनाच गतिमान होण्याचे वेध लागले आहेत. सत्ता टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे, तर दुसरी पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपड चालली आहे. काही ठिकाणी अस्तित्त्‍वात असलेल्या यंत्रणेलाच सुरूंग लावण्याचे प्रयत्न सुरू झालेत. कोविडपासून संरक्षण, जागरूकतेपेक्षाही इतर विषयांकडे अधिक लक्ष देताना शासन व विरोधक दिसत आहेत. बहुसंख्य लोक एकत्र येऊन सभा, बैठका, आंदोलन, निदर्शने करण्यात येत आहेत. ज्येष्ठ, अनुभवी नेतेमंडळीसुद्धा पुढेच आहेत. त्यांनाही कोविडबद्दल काहीच वाटत नाही. परंतु यातून होणारे नुकसान जनतेचे आहे. पर्यावरण, अस्मिता जपणुकीसाठी विरोध केलाच पाहिजे, परंतु सध्याच्या काळात विरोधाचे, निदर्शनाचे स्वरुप बदलायला हवे. याबद्दलची साक्षरता कधी येणार, हा एक मोठा प्रश्नच आहे.

आमच्या वेबसाईटवरच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोविडमुळे सगळीकडेच कुलूप लावण्यात आले होते. सगळेच व्यवहार सुरू केल्यानंतर शाळा, मंदिरे, वाचनालयेच का बंद, ती सुरू करण्यासाठी काहींनी प्रयत्न केले. शासनानेही यापैकी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही नियम केले, त्यानुसार दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. याविषयावरही याच स्तंभातून अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यापैकी काही मुद्द्याचा विचार निश्चित करण्यात आला. ही चांगली बाब आहे. शाळांचे प्रयत्न स्तुत्य आहेत. मुलांची काळजी योग्य प्रकारे घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक शाळांतून स्वच्छतेचे धडे गिरवायला सुरवात झाली आहे. दररोज शाळा स्वच्छ होत आहेत. त्यामुळे तेथे प्रसन्न, शांततेचे वातावरण आहे, अशीच स्वच्छता या ज्ञानमंदिरातून असायला हवी. त्यासाठी व्यवस्थापनाने प्रयत्न करायला हवे. कारण अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांना बाधा होते. शुद्ध पाणी, शुद्ध हवा न मिळाल्याने आजारात वाढ होते. ती यापुढे होणार नाही. कोविडमुळे स्वच्छतेचे धडे कायम गिरवले तर कदाचित विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहाण्यात मदत होणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मात्र खूप काही बदल झालेले नाहीत. ज्या प्रमाणात शाळांतील स्वच्छतेची, नियमांचे पालन होते, की नाही, याकडे शिक्षण खात्याचे लक्ष आहे. त्याप्रमाणे वाहतूक खात्याचे लक्ष नाही. त्यामुळे अनेक बसेसमध्ये गर्दी होत आहे. सामाजिक अंतर किंवा इतर नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. अनलॉकमध्येही नियम पाळणे सर्वांवरच बंधनकारक आहे. त्याला स्थानिक, परप्रांतीय असा भेद नाही. बसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही मास्क बंधनकारकच हवा. कोणालाही सवलत देऊच नये. मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी लक्ष द्यायला हवे. पणजीतील चर्च क्वेअरजवळ दररोज पर्यटकांची मोठी गर्दी असते. वाहतूक कोंडीही होते. परंतु तेथे असलेले पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्या कोपऱ्यात गप्पा मारत उभे असतात. हा प्रकार निषेधार्थ आहे. त्यांनी आपले काम चोख बजावले, तर तेथे होणारी गर्दी कमी होईल. सर्वांनी नियमांचे पालने केले, तर कोविडचा काही प्रमाणात धोका कमी होईल. आता येणाऱ्या पर्यटक किंवा अन्य लोकांना कोणीही थांबवू शकत नाही. सीमा खुल्या झाल्यानंतर ते आले आणि ग्रीन झोनचा गोवा केव्हा रेड झाला हे कळलेच नाही.

हेल्मेट वापरा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, गहाण करू नका, मूत्र विसर्जन करू नका, नियम पाळा, असे कोणालाच सांगण्याची गरज नाही. कारण लॉकडाऊनमध्ये प्रत्येकालाच किती त्रास झाले, किती अडचणी आल्या. याचा हिशोब, डेटा प्रत्येकाचा वेगळाच असला तरी तो सुखद नाहीच. लॉकडाऊनमध्ये आपण थोडे शहाणे झालो, समजूतदार झालो, म्हणून तर शासनाने टप्प्या टप्याने अनलॉक केले. याचे भान आपण ठेवले पाहिजे. सुजाण, समजूतदार नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. पण गेल्या आठ महिन्यात काहीच झालेच नाही, आपल्यालाल अमरपट्टा लाभल्यासारखे सगळेच सैरभेर झाले. मोकाट सुटले. त्यामुळेच छोट्या गोव्यात कोविडचा संसर्ग वाढला. याला आपणच जबाबदार आहोत. कोविडवर अद्याप औषध नाही. हेही सर्वांना माहित आहे. तर आपण जबाबदारीने वागायलाच हवे. पर्यटक आले, तेही बिनधास्त. पर्यटनस्थळावर कोणाकडेही मास्क नाही, की इतर कोणत्या सुरक्षिततेच्या गोष्टीही नाहीत. बिनधास्त धिंगाणा सुरू झाला. याकडेही पोलिस किंवा संबंधित यंत्रणाही झोपेचे सोंग घेतले. याबाबात कोणालाही दंड करून उपयोग नाही, तर त्यांच्या डोक्यात स्वतःबरोबर इतरांच्या आरोग्याचाही विचार हवा. पोलिस इमानेइतबारे रस्यारस्त्यांवर पावती फाडण्याचे काम मात्र करतात. आता पावती पुस्तकापेक्षा मशीन घेऊनच उभे असतात. परप्रांतातील गाडी दिसली, की लगेच थांबण्याचा इशारा करतात. नियमांचे उल्लंघन केले तर जरूर कारवाई करा, पण अनलॉकमध्ये सगळीकडे वाढत चाललेला बेशिस्तपणा कमी करा. गोव्यात नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. तेथे बेशिस्तपणा चालत नाही. हा संदेश पर्यटकांपर्यंत पोचवा. शिस्तबद्द व सुरक्षित पर्यटनाची हमी द्या. तरच गोव्यात पर्यटन व्यवसायाची अर्थचक्रे गती घेतील, अन्यतः बेशिस्तीची जाहीरात सगळीकडे पर्यटकच पोचवतील. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट होईल. त्यामुळे यंदाचीही आपली गुंतवणूक वाया झाली.

हिवाळ्यात कोरोनाची लाट येणार, म्हणून कोणालाही भिती दाखवण्यापेक्षा कोविडपासून बचावासाठी शिस्तबद्ध पर्यटनावर भर द्या. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आपल्या निश्चित ठिकाणी दररोज सुरक्षित कसे पोचतील, याचा विचार शासनाने करावा. महाराष्ट्रात कोविडच्या भीतीने पुन्हा काही नियमांची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत अनेकांची तारांबळ उडाली. गोव्यातून बाहेर जाणाऱ्यांनी कोविड चाचणी करून घेतली गोव्यातसुद्दा विमानाने येणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग सुरू केले. या सर्व गोष्टी कोविडच्या भीतीमुळे घडत आहेत. म्हणजेच कोविड संपलेला नाही, तो अजून जीवंत आहे, सक्रिय आहे. हे शासनाबरोबरच सर्वांनाच मान्य आहे. तर मग कोविडपासून आपला बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करायलाच हवे. किमान लस येईपर्यंत तरी जबाबदारीने नियमांचे पालन करा, गाफील राहू नका.

संबंधित बातम्या