Goa : पगार वाढीसह अनेक मागण्यांसाठी फोंडा इस्पितळातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Goa : पगार वाढीसह अनेक मागण्यांसाठी फोंडा इस्पितळातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Employees of ponda ID Hospital strike for several demands including salary hike

फोंडा : फोंडा (ponda) आयडी उपजिल्हा इस्पितळात (ID Hospital) डेटा एंट्रीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन छेडले. या इस्पितळात युनायटेड टेलेकॉम लिमिटेड (United Telecom Limited) या आस्थापनाशी संबंधित एकूण नऊ कर्मचारी काम करतात. सुमारे पाच वर्षे महिना साडेपाच हजार रुपयांवर हे कर्मचारी फोंड्यात काम करीत असून कोविड काळातही त्यांनी सेवा दिली आहे. मात्र, पगार वाढवला जात नसल्याने त्यांनी इतर मागण्या (Demands) समोर ठेवत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

या कर्मचाऱ्यांनी पगार वाढवून सेवेत कायम करण्याची मागणी केली आहे. इस्पितळात रुग्णांची नोंदणी करण्याचे तसेच इतर कामे हे कर्मचारी करीत असून सेवेत घेताना प्रत्येक तीन महिन्यांनंतर पाचशे रुपये पगारात वाढवले जातील असे सांगितले होते, पण अजूनपर्यंत ही पगारवाढ झालेली नाही. त्यामुळे किमान पंधरा हजार रुपये प्रती महिना पगारवाढ करून सेवेत कायम करण्यासाठी काम बंद आंदोलन छेडले असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास कुवेलकर यांनी या कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे सकाळी रुग्णांची गैरसोय झाल्याचे नमूद केले. इस्पितळ कर्मचाऱ्यांनी त्यानंतर रुग्णांची नोंदणी केली. या कर्मचाऱ्यांचे काम तसे सीमित असून मागण्यांवर संबंधितांनी विचार करावा, असे सांगताना इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांवर या कामाचा बोजा पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com