खाजन जमिनीतील शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

goa bhat sheti
goa bhat sheti

सासष्टी  : खाजन शेत जमीन लागवडीखाली आणण्यासाठी कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असून गोवा भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयसीएआर) विकसित केलेल्या गोवा दान बियाण्याचे शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले आहे.

बार्देश, तिसवाडी, बिचोली, सासष्टी या तालुक्यातील शेतकऱ्यांना खाजन जमिनीवर शेती करण्यासाठी प्रशिक्षिणही देण्यात आले आहे, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक नेविल आफोन्सो यांनी दिली.

जुन्या सर्वेक्षणानुसार गोव्यात १८ हजार हेक्टरच्या आसपास खाजन जमीन असून त्यात दोन ते तीन हजार हेक्टर जमिनीत खारफुटीने अतिक्रमण केले आहे. सध्या गोव्यात दहा हजार हेक्टर खाजन जमिनीत शेती करण्यात येत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात खाजन जमिनीतील लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहे. बार्देश, तिसवाडी, डिचोली आणि सासष्टी तालुक्यातील अनेक शेतकरी खाजन जमिनीत शेती करण्यासाठी पुढे आलेले असून या शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, असे नेवील आफांसो यांनी सांगितले.

यंदाच्या रबी हंगामात कृषी विज्ञान केंद्राची चिंचिणी येथील दुर्गा फार्मच्या पडीक खाजन जमिनीत गोवा दान बियाण्याची पेरणी करण्यात आली होती. दुर्गा फार्मवर केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे खाजन जमिनीत शेती करण्यासाठी पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना गोवा दान बियाणाचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

गोव्यात पूर्वी कोरगुट या जातीच्या बियाणाचा वापर खाजन शेतीजमिनीत करण्यात येत होता. पण, आता गोवा दान १ आणि गोवा दान ३ व ४ या भाताच्या बियाणाचा प्रयोग यशस्वी झाल्याने संपूर्ण गोव्यातील खाजन जमिनीत लागवड करण्यासाठी या बियाणाचा वापर करण्यात येणार आहे. आयसीएआरने विकसित केलेले गोवा दान ही मीठ प्रतिरोधक (सॉल्ट रेसिस्टंट) आहे, असे आफोन्सो यांनी सांगितले.

कृषी विभागीय कार्यालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार पडीक राहिलेल्या शेत जमिनीवर लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली होती. खाजन जमिनीत शेती करण्यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले आहे.

गोव्यातील अनेक शेतकऱ्यांनी खाजन जमिनीत शेती करण्यास सुरुवात केली आहे, असे आफोन्सो यांनी सांगितले. ज्या ठिकाणी यांत्रिकरीत्या नांगरणी, पेरणी आणि कापणी करणे शक्य आहे, त्या ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने भातशेती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com