कामगारांना २००० रुपये भरल्यावरच गोव्यात प्रवेश; गोवा- कर्नाटक सीमेवर तणाव

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

कर्नाटकाची कोविड मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) वेगळी व गोव्याची वेगळी कशी, हा वादाचा मुद्दा ठरला आहे. केंद्राने सर्व राज्यांसाठी एकच एसओपी जारी केली असताना हा भेद का? असा प्रश्न गोव्यात येऊ इच्छिणारे करू लागले आहेत. 

काणकोण: पोळे तपासणी नाक्यावर कर्नाटकातून वेर्णा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगार व पोलिस यांच्यात सोमवारी वादावादी झाली. दोन हजार रुपये भरा, तरच मिळेल प्रवेश, असा आग्रह तपासणी नाक्‍यावरील पोलिसांनी धरल्‍यामुळे तेथे काहीवेळ तणाव निर्माण झाला. कर्नाटकाची कोविड मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) वेगळी व गोव्याची वेगळी कशी, हा वादाचा मुद्दा ठरला आहे. केंद्राने सर्व राज्यांसाठी एकच एसओपी जारी केली असताना हा भेद का? असा प्रश्न गोव्यात येऊ इच्छिणारे करू लागले आहेत. 

गोव्यातून कर्नाटकात जाण्यासाठी सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. माजाळी येथील कर्नाटकाचा तपासणी राज्यात येणाऱ्या व राज्यातून जाणाऱ्यांंसाठी नाका खुला केला आहे. राज्य सरकारने मागील एसओपी मागे घेतली नाही. त्यासाठी पोळे तपासणी नाक्यावर कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या नागरिकांकडून घशातील स्रावाच्‍या तपासणीसाठी दोन हजार रुपये शुल्क घेण्यात येतात. तसेच हातावर स्टॅम्प मारून चौदा दिवसांचा होम क्वारंटाईन राहण्याची सक्ती करण्यात येते, असे काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी बाणावली येथील एका बोट मालकाने अशाच प्रकारे शुल्क भरून बोटीवर काम करण्यासाठी कामगारांना आणले आहे. नागरिकांमधील गोंधळ टाळण्यासाठी सरकारने या संदर्भात स्पष्ट निर्देश देणारी एसओपी पुन्हा जारी करण्याची मागणी लोलये-पोळे पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच अजय लोलयेकर यांनी केली आहे.

वादाचे कारण...
सोमवारी सकाळी कारवारच्या वेगवेगळ्या भागातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या साठ महिला कामगारांना आणण्यासाठी एका कारखान्‍याचा मालक पोळे तपासणी नाक्यावर गेला होता. त्यांना केंद्र सरकारचे नवे निर्देश व राज्य सरकारची एसओपी यामध्ये तफावत आढळून आले. याबाबत तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून सत्य जाणून घेण्याचा त्‍या मालकाने प्रयत्न केला. बराच वेळ चर्चाही केली. अखेर नाईलाजाने ‘त्या’ साठ महिला कामगारांच्या घशातील स्रावाच्‍या तपासणीसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये शुल्क भरले व महिला कामगारांना गोव्‍याच्‍या हद्दीत आणले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या