कौतुकास्पद.. काही पर्यावरणप्रेमींचा रॅपच्या माध्यमातून अभयारण्य वाचविण्याचा प्रयत्न

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

रॅप हा संगीत प्रकार हल्ली क्रांतिकारी स्वरूपात आजच्या तरुणाईने स्वीकारला आहे. वेगवगेळ्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी रॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोचविला जातो. मोले अभयारण्यामध्ये होणाऱ्या प्रकल्पांमुळे येथील सुमारे ७० हजार झाडे तोडली जाणार आहेत. हे नुकसान कोण भरून काढणार असा प्रश्न राज्यातील रॅपर रॅपच्या माध्यमातून विचारत आहेत.

पणजी :  रॅप हा संगीत प्रकार हल्ली क्रांतिकारी स्वरूपात आजच्या तरुणाईने स्वीकारला आहे. वेगवगेळ्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी रॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोचविला जातो. मोले अभयारण्यामध्ये होणाऱ्या प्रकल्पांमुळे येथील सुमारे ७० हजार झाडे तोडली जाणार आहेत. हे नुकसान कोण भरून काढणार असा प्रश्न राज्यातील रॅपर रॅपच्या माध्यमातून विचारत आहेत. पणजीचा कबीर नाईक याचे ‘मोले तुम्हाला बोलवतेय’ आणि मायणा येथील सोहेल सय्यदचे ‘बरबादी, बरबादी ये बरबादी’ हे दोन्ही रँप आता सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. 

जैवविविधतेचे माहेरघर असणारे पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यान परिसरात राष्ट्रीय महामार्ग ४ए चे रुंदीकरण, रेल्वे रुळाचे दुपदरीकरण तसेच नवीन विद्युत प्रसारकाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ५५ हजार झाडांची कत्तल करण्यात येणार असून हजारो नैसर्गिक जीवांचा अधिवास हिसकावून घेतला जाणार आहे. १०० ते २०० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असणारी ही वृक्षसंपत्ती वाचविण्यासाठी आता हे रँपर पुढे येत आहेत. 

सोहेल याने लिहलेले रँप आतापर्यंत अकराशेपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. हे रॅप तीन भागात विभागले आहे. या रॅपमध्ये सोहेलने पर्यावरणाचे होणारे नुकसान अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहे. आपलेच रक्षण करणाऱ्या नेतेमंडळींनी इतर प्राणीमात्रांची घरे हिसकावून का घ्यावीत असा प्रश्न त्याने केला आहे. शिवाय पर्यावरणामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल माहितीसुद्धा दिली आहे. 

कबीर नाईक याने मोले येथील अभयारण्यात स्वतः जाऊन तेथील निसर्ग दाखवत शूट केलेल्या रँपला खूप पसंती मिळत आहे. थंड वाहणारा झरा, हिरवीगार वनराई पाहून काही दिवसात हे नष्ट होणार अशी हळहळ लोकांकरवी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. 
आताची पिढी सजग झाली असून पर्यावरण संवर्धनाचे महत्व या पिढीला माहिती असल्याचे या नव्या रँपमय आंदोलनामुळे लक्षात येत आहे.

लिसीप्रिया कांगुजम हिने केले ट्विट 
जागतिक पातळीवर पर्यावरण बचावासाठी आणि मानवी हक्कासाठी लढणाऱ्या लिसीप्रिया कांगुजम या ९ वर्षाच्या मुलीनेसुद्धा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ट्विटद्वारे मोले वाचविण्यासाठीची मागणी केली आहे. कोळशासाठी आणि रेल्वे दुपदरीकरणासाठी कृपया जंगल नष्ट करू नका. यामुळे हजारो प्राण्यांची घरे नाहीशी होणार असल्याचे तिने म्हटले आहे.

संबंधित बातम्या