कोलवाळ जेलमधून कैद्याचे पलायन;  तुरुंगरक्षक निलंबित

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

कैद्यांनी हा कचरा पालिकेच्या कचऱ्याच्या वाहनात टाकला व त्यानंतर हेमराज भारद्वाज याने लघुशंकेसाठी बाजूला असलेल्या ठिकाणी जातो असे तुरुंगरक्षकाला सांगितले. तुरुंगरक्षकाने पाठ फिरवताच त्याने तेथून धूम ठोकली. त्याचा पाठलाग काही तुरुंगरक्षकांनी केला, मात्र तो तेथून गायब झाला.

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून ड्रग्ज गुन्हाप्रकरणातील कच्चा कैदी (अंडरट्राईल) हेमराज मोलकराम भारद्वाज (२८) याने पलायन केले. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. त्‍यामुळे निष्काळजीपणाचा ठपका ठेवून तुरुंगरक्षक प्रकाश नाईक याला निलंबित केले आहे. या कैद्याला पेडणे पोलिसांनी यावर्षी जानेवारीमध्ये ड्रग्जप्रकरणी अटक केली होती. या कैद्याचा शोध सुरू असल्याची माहिती कारागृह महानिरीक्षक गुरुदास पिळर्णकर यांनी दिली. 

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तसेच न्यायालयात खटला सुरू असलेल्या कैद्यांना कारागृहातील कचरा उचलण्याचे काम दिले जाते. हा कचरा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर येणाऱ्या पालिकेच्या वाहनापर्यंत तुरुंगरक्षकांच्या उपस्थितीत हे कैदी घेऊन जातात. त्यानुसार तुरुंगरक्षक प्रकाश नाईक हे आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास तीन कैद्यांना कचरा टाकण्यासाठी पालिका वाहनापर्यंत घेऊन गेले. 

लघुशंकेचे केले निमित्त आणि...
कैद्यांनी हा कचरा पालिकेच्या कचऱ्याच्या वाहनात टाकला व त्यानंतर हेमराज भारद्वाज याने लघुशंकेसाठी बाजूला असलेल्या ठिकाणी जातो असे तुरुंगरक्षकाला सांगितले. तुरुंगरक्षकाने पाठ फिरवताच त्याने तेथून धूम ठोकली. त्याचा पाठलाग काही तुरुंगरक्षकांनी केला, मात्र तो तेथून गायब झाला.

अटकेचे ‘व्हायरल’ वृत्त खोटे
कारागृहातून पळालेला कैदी हेमराज भारद्वाज याला अटक झाल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ देण्यात आली. त्यामुळे कारागृहाचे अधिकारी यांनीही ही माहिती एकमेकांना पाठविली. यासंदर्भात त्यांनी पेडणे व म्हापसा पोलिस स्थानकाशी संपर्क साधला असता हेमराज या नावाचा कैदी सापडला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे व्हायरल झालेले हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट झाले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या