नागरी पुरवठा खात्यातर्फे जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्‍हाव्‍यात

Sudesh Arlekar
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

 ‘कोविड १९’च्या महामारीमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती फारच गंभीर झाली आहे. कामधंदे बंद पडले असून, बेरोजगारीच वाढलेली आहे. अशा वेळी जीवनावश्यक वस्‍तूंचा पुरवठा जर स्वस्त धान्याच्या दुकानांतून झाला तर सर्व लोकांना सद्यस्‍थितीत मोठा दिलासा मिळेल,

म्हापसा, : गोव्यातील सर्व बीपील/एनएफएस रेशनकार्ड धारकांना तांदूळ व गहू यांच्‍या व्यतिरिक्‍त साखर, खाद्यतल, डाळ, केरोसीन व इतर जीवनावश्यक वस्‍तूंचा राज्य सरकारच्या पुरवठा नागरी पुरवठा खात्यातर्फे सवलतीच्या दराने करावा, असे निवेदन गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक व महिला विभागाच्या अध्यक्ष शुभांगी गुरुदास वायंगणकर यांनी नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांना दिले आहे.
हे निवेदन सादर करताना त्यांच्‍यासमवेत महिला विभागाच्या उपाध्‍यक्ष भारती नाईक, उगे-सांगेच्या सरपंच वैशाली नाईक, प्राचार्य रामराव वाघ, तसेच नवनाथ नाईक, श्रीकृष्ण हळदणकर, कृष्‍णनाथ चोपडेकर, श्रीजया हळदणकर व सुमती चोपडेकर उपस्‍थित होत्या.
आज ‘कोविड १९’च्या महामारीमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती फारच गंभीर झाली आहे. कामधंदे बंद पडले असून, बेरोजगारीच वाढलेली आहे. अशा वेळी जीवनावश्यक वस्‍तूंचा पुरवठा जर स्वस्त धान्याच्या दुकानांतून झाला तर सर्व लोकांना सद्यस्‍थितीत मोठा दिलासा मिळेल, असे अशोक नाईक यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भात बोलताना शुभांगी वायंगणकर म्हणाल्या, या विषयावर भंडारी समाजातील महिलांतर्फे सर्व तालुक्‍यांतून व्‍हॉट्‍सॲपद्वारे विनंतीअर्ज आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव, मुलांच्या शाळा व कॉलेज प्रवेशाच्या फीचा ताण तसेच टाळेबंदीच्या काळात अडकून पडलेल्या वीज व पाण्याच्या बिलांची आकारणी अशी प्रतिकूल परिस्‍थिती सध्या गोव्यात निर्माण झाली आहे.
इतर राज्यांप्रमाणे तांदूळ, गहू यांच्या व्यतिरिक्त साखर, डाळ, केरोसीन व इतर जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा नागरी पुरवठा खात्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही सौ. वायंगणकर म्हणाल्या. दरम्यान, विविध तालुक्‍यांतून अर्ज घेण्यासाठी राजेश्री हळदणकर, रोशन आगारवाडेकर, प्रतीक्षा मयेकर, प्रभा वंदना मयेकर, शैला नाईक, सुनिता चोपडेकर, सविता बोरकर, श्रीजया हळदणकर, वैशातली तारी, भारती नाईक, उर्मिला कवठणकर, कला नाईक, दीपा नाईक, पुर्णिमा नाईक, स्नेहा नाईक, रिमा नाईक यांनी सहकार्य केले असल्याचे त्‍यांनी नमूद केले.

 

संबंधित बातम्या