जीसीईटी परीक्षेवेळी कन्टेनमेंट झोनसाठी वेगळे केंद्र स्थापन करा

dainik gomantak
सोमवार, 29 जून 2020

दहावीच्या परीक्षेवेळी ज्या मानक परिचालन सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली तीच कायम ठेवून कन्टेनमेंट झोनध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी वेगळे परीक्षा केंद्र ते राहत असलेल्या तालुक्यात केले जावे.

पणजी

राज्यात कोविड - १९ ची परिस्थिती बदली असल्याने गोवा समान प्रवेश परीक्षेसाठी (जीसीईटी) ज्या
कन्टेनमेंट झोनमधील विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र वेगळे करण्याची तसेच त्यामध्ये वाढ करण्याची मागणी गोवा यूथ फॉरवर्डचे उपाध्यक्ष रुणाल केरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 
केंद्राने प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नसताना गोवा सरकारने मात्र विद्यार्थ्याना वेठीस धरून गोवा सीईटी परीक्षा येत्या ४ व ५ जुलै ठेवली आहे. सुमारे ३ हजाराहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहे. ही प्रवेश परीक्षा घेण्यास गोवा यूथ फॉरवर्डचा विरोध नाही मात्र परीक्षासाठी केंद्राने लागू केलेली मानक परिचालन सूचनेची (एसओपी) काटेकोरपणे पाळण्यात यावी. या परीक्षांना काही गटांकडून विरोध होत आहे मात्र गोवा फॉरवर्ड पक्षाला त्याचे राजकारण करायचे नाही. यापूर्वी दहावीच्या परीक्षेला विरोध झाला होता मात्र मानक परिचालन सूचनांचा वापर करून त्या घेण्यासाठी न्यायालयानेच सरकारला परवानगी दिली होती. 
दहावीच्या परीक्षेवेळी ज्या मानक परिचालन सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली तीच कायम ठेवून कन्टेनमेंट झोनध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी वेगळे परीक्षा केंद्र ते राहत असलेल्या तालुक्यात केले जावे. परीक्षा केंद्रामध्ये वाढ करावी जेणेकरून विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी जादा प्रवास करण्याची पाळी येणार नाही, असे केरकर म्हणाले. 
 

संबंधित बातम्या