गुळेली आयआयटी बचाव समितीची स्थापना

Premnath Naik
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

सत्तरी तालुक्यातील गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या गुळेली आयआयटी शिक्षण संकुलाच्या समर्थनार्थ आयआयटी बचाव समिती स्थापन झाली असून आज पत्रकार परिषदेद्वारे गुळेली पंचक्रोशीतील त्याचबरोबर सत्तरीतील जनता आयआयटी समर्थनार्थ असून आयआयटी विरोधकांनी नाहक अपप्रचार करू नये, असे पत्रकार परिषदेद्वारे समितीच्या सदस्यांनी सांगितले.

गुळेली
यावेळी पत्रकारांशी बोलताना या समितीचे अध्यक्ष श्‍याम सांगेकर म्हणाले, की गुळेली पंचायत क्षेत्रात मेळावली भागात होऊ घातलेला प्रकल्प फक्त गुळेली व मेळावली भागापुरता मर्यादित नसून त्याचा फायदा संपूर्ण सत्तरीबरोबरच गोव्यालाही होणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वांना या प्रकल्पाला सहकार्य करण्याची गरज आहे. या प्रकल्पाला विरोध करणारे आपल्याच भागातील लोक आहेत त्यांना याबद्दल विशेष अशी माहिती नसल्याने ते विरोध करत आहेत. त्याचबरोबर बाहेरचे लोक या ठिकाणी येऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना चुकीची माहिती देत आहेत. या प्रकल्पामुळे कुठलाच गाव जाणार नाही की कुठल्याच देवळाला धक्का पोचणार नाही किवा कुणाचे काही नुकसान होण्याचा प्रश्‍नच नाही. कारण ही दहा लाख चौ.मि. जमीन सरकारची आहे. बाहेरच्या लोकांनी या प्रकल्पाला विरोध करू नये. कारण हा शैक्षणिक प्रकल्प आहे. सरकारी धोरणानुसार त्यात स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. तसेच गोव्यातील विद्यार्थ्यांनाही परगावी जाण्याऐवजी गोव्यात आयआयटीसारखे शिक्षण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आाम्ही या प्रकल्पाला सहकार्य करणे आवश्‍यक आहे. हा प्रकल्प आम्हाला पाहिजेच. त्यासाठी आमची कमिटी घरोघरी पत्रके वाटून माहिती देणार आहे.
काही गावाबाहेरचे लोक या ठिकाणी येऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. झाडे, वनराई नष्ट होणार असल्याची भीती घालत आहेत. परंतु या लोकांना या भागाची नीट माहिती नाही. यातील ८० टक्के जमीन पूर्णपणे खडकाळ आहे, ज्याला स्थानिक भाषेत ‘सडो’ म्हणतात.
१२ लाख चौ. मी. पैकी दहा लां चौ. मी. जमीन जी या प्रकल्पाला वापरण्यात येणार आहे त्यातील ८० टक्के जमीन खडकाळ आहे. त्यामुळे जे कुणी सुपीक म्हणतात, त्यांच्या डोक्यात हा नापिक विचार कसा येतो. आम्ही या भागात पूर्णपणे फिरलो आहे. त्यामुळे बाहेरच्या लोकांनी येऊन आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. सरकारने हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.
गुळेली आयआयटी बचाव समितीचे सचिव अजित देसाई म्हणाले, समाजातील प्रत्येक स्तरावर या समितीचे सदस्य जाऊन या आयआयटी प्रकल्पाला समाजाचा किती पाठिंबा आहे हे लोकांसमोर आणणार आहे. त्याची मोहीम सुरू करणार आहे. सत्तरीत जागतिक दर्जाचा प्रकल्प आपल्या पंचायत क्षेत्रात येतो या सरस्वतीची आराधना आपण सर्वांनी केली पाहिजे. हा काही प्रदुषणकारी प्रकल्प नाही. काही लोक या प्रकल्पाला विरोध करतात ते अज्ञानामुळे. त्यामुळे या विरोधाला बळी न पडता सरकारने लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करावा, अशी विनंती यावेळी त्यांनी केली. कोरोना संकटामुळे नवे प्रकल्प येणे मुश्‍किल असताना या सुवर्णसंधीचा फायदा लोकांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.
समितीचे खजिनदार ओमप्रकाश बर्वे म्हणाले, की हा चांगला प्रकल्प असून या प्रकल्पाचा बचाव करण्यासाठी समिती काढावी लागली हे आमचे दुर्दैव आहे. स्थानिक लोकांना भडकविण्याचे काम काही लोक करतात. सह्यांद्वारे आमचे समर्थन आम्ही दाखविणार आहे. लोकशाही मार्गाने ही समिती कार्य करणार आहे. उगीच कमिशनचा मुद्दा काहीजण उपस्थित करीत आहेत. त्यांनी एका खोलीत बसून आम्हाला शिकविण्याची गरज नाही. या समितीचे सहसचिव व गुळेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विशांत नाबर. समितीच्या सदस्य आरती घोलकर यांचीही यावेळी आयआयटीच्या समर्थनार्थ भाषणे झाली.
यावेळी जाहीर करण्यात आलेली गुळेली आयआयटी बचाव समिती पुढीलप्रमाणे - अध्यक्ष - श्‍याम खांडेकर, उपाध्यक्ष - लक्ष्मण मेळेकर, सचिव - अजित देसाई, सहसचिव - विशांत नाबर, खजिनदार - ओमप्रकाश बर्वे, उपखजिनदार - आत्माराम देसाई, सभासद - लवू गावकर, प्रकाश नाईत, प्रेमनाथ हजारे, फिलीप मास्कारेन्हस, आरती घोलकर, दशरथ नाईक, संतोष गावडे, रोहिदास गावकर, निवास गावडे, नवनाथ उसगावकर, संदीप देसाई, विशाल नाईक, सुकडो उपसकर, उमेश कासकर, दीपक च्यारी.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या