स्वातंत्र्यानंतरही हरिजनबांधवांना ‘वाट’ मिळेना..!

हसापूर ः हरिजनबांधवांना याच कच्च्या रस्त्यावरून दररोज पायपीट करावी लागत आहे.
हसापूर ः हरिजनबांधवांना याच कच्च्या रस्त्यावरून दररोज पायपीट करावी लागत आहे.

मोरजी
‘जग बदल घालुनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव...’ या ओळीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खऱ्या-खुऱ्या स्वातंत्र्याचे जीवन जगण्यासाठी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या प्रेरणेतून हा संदेश दिला आहे. पंरतु स्वातंत्र्यानंतर अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेल्या भारत देशात आजही हरिजनबांधव आपल्या न्याय, हक्कासाठी झगडतो आहे आणि हे वास्तव आहे. कारण पेडणे मतदारसंघातील हसापूर या ठिकाणच्या दलित वाड्यावर जाण्यासाठी दलितबांधवांना आजही ‘वाटे’साठी चाचपडावे लागत आहे आणि त्यामुळेच अखिल गोमंतक महारगण महासभेचे निमंत्रक अविनाश जाधव यांनी शनिवारी १५ ऑगस्ट रोजी पेडणेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.  ‘कोरोना’ संसर्गाचा धोका लक्षात घेऊन सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून हे उपोषण करणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. पेडणे तालुक्यातील हसापूर पंचायत क्षेत्रात हरिजन लोकवस्ती आहे. हा समाज सदैव पीडित, शोषित राहिला असून, प्रसंगी अन्यायही सहन करीत आला आहे. पेडणे मतदारसंघ या राखीव मतदार संघात येतो. या मतदारसंघाचे दलित नेते उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर प्रतिनिधित्व करतात. राखीव मतदारसंघातून आतापर्यंत देऊ मांद्रेकर, राजेंद्र आर्लेकर व बाबू आजगावकर आमदार बनले आहेत. तरीही दलितबांधवांना पक्का रस्ता मिळत नसल्याने, ही शोकांतिका म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यावरून वाड्यावर पोहोचेपर्यंत तेथील लोकांना बरीच कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेली ही लोकवस्ती अत्यंत पुढारलेल्या या राज्यात मागासलेपणाचा भार वाहत आहे. तरीही हसापूर येथील दलित समाजाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष हे खरेखरच स्वातंत्र्य म्हणावे का, असा प्रश्‍न येथील लोकांना पडत आहे. सरकारने स्वातंत्र्याची मुक्ताफळे उधळण्याबरोबच राज्यातील हरिजनबांधवांच्या समस्या निकालात काढण्याची गरज बनली आहे. 

दलितांसाठीच्या निधीविषयी प्रश्‍नचिन्ह... 
ंकेंद्र सरकारकडून दलितांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य सरकारकडे येतो. त्यातून दलित वस्त्यावर रस्ते, शौचालय, पायवाट, घर दुरुस्ती, सभागृह, स्मशानभूमी यावर खर्च करायचा असतो. परंतु आजही दलितबांधवांचे प्रश्‍न सुटले नसल्याने हा निधी नेमका जातो कुठे, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

संपादन ः संदीप कांबळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com