‘कोविड’ युद्धातही पुरोगामी परंपरेला जागत मडगावचा राज्यासमोर आदर्श

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

कोरोनाने प्रभावित २०२० मध्ये सासष्टीत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या. कोरोना संकट काळात दोन कोविड इस्पितळे सुरू झालेल्या मडगाव शहराने आपल्या पुरोगामी परंपरेला जागून राज्यासमोर आदर्श घालून दिला. 

कोरोनाने प्रभावित २०२० मध्ये सासष्टीत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या. कोरोना संकट काळात दोन कोविड इस्पितळे सुरू झालेल्या मडगाव शहराने आपल्या पुरोगामी परंपरेला जागून राज्यासमोर आदर्श घालून दिला. 
मागच्या वर्षी मार्चमध्ये होणारी जिल्हा पंचायत निवडणूक कोविडमुळे शेवटच्या क्षणी रद्द झाली. या वर्षअखेर घेण्यात आलेल्या या निवडणुकीने सासष्टीत काही उलथापालथी घडल्या. आम आदमी पार्टीचा (आप) गोव्याच्या राजकारणात उदय होण्याची महत्त्वपूर्ण घटना सासष्टीत घडली. राज्यात इतर ठिकाणी निष्प्रभ ठरेलेल्या आम आदमी पार्टीने (आप) सासष्टीतील बाणावली मतदारसंघात या निवडणुकीत विजय मिळवला. सासष्टीचे मातब्बर नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी उभे केलेल्या मीनिन फर्नांडिस यांचा त्यांनी पराभव केला. आपच्या हेंझल फर्नांडिस या नवख्या तरुणाने राजकारणात मुरलेल्या चर्चिल आलेमाव यांना दणका दिला.    

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून भाजपने सासष्टीत या वर्षी आपली ताकद वाढवली. दवर्लीतील उल्हास तुयेकर यांच्यासह गिरदोलीतही भाजपच्या संजना वेळीप विजयी झाल्या. त्यांच्या विजयामुळे सासष्टीत झेडपी सदस्यांचे संख्याबळ दोन असे वाढले. 
भाजप, आप पक्षाला ही निवडणूक लाभदायी ठरत असताना कॉंग्रेसची मात्र पिछेहाट झाली. निवडणूक झालेल्या आठपैकी केवळ तीन जागा कॉंग्रेसला पटकावता आल्या. कुडतरी, वेळ्ळी व नुवे या तीन जागांवरच कॉंग्रेसला समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला बाणावलीत आपने तडाखा दिला असला तरी कोलवा मतदारसंघात वानिया बाप्तिस्त यांच्या रुपात त्यांनी एक मतदारसंघात विजय मिळवला. डॉम्निक गावकर यांनी राय मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राखत तिसऱ्यांदा विजय मिळवला. मागच्या निवडणुकीत हा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आल्याने त्यांनी त्यांच्या पत्नी फातिमा गावकर यांना निवडणुकीत उतरवले होते व त्यांना जिंकूनही आणले होते. त्यामुळे सलग चार निवडणुकीत गावकर परिवाराने विजय मिळवून आपला दबदबा निर्माण केला आहे.

 संपूर्ण जगात प्रभाव असलेल्या कोविडने सासष्टीतील जनजीवनावरही परिणाम झाला. पण, कोविड विरुद्धच्या लढ्यात मडगावने राज्याचे  पुढारपण करताना मोलाचे योगदान दिले. मडगावमध्ये सुरुवातीला इएसआय इस्पितळात कोविड इस्पितळ सुरु करण्यात आले. कोविड रुग्ण व उपचाराबाबत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण व बऱ्याच ठिकाणी विरोध सुरु असताना हे इस्पितळ मडगावात सुरु झाले. पुरोगामी चळवळी व सामाजिक सुधारणांमध्ये नेहमीच गोव्याचे नेतृत्व केलेल्या मडगावमध्ये या इस्पितळाला कोणीही विरोध केला नाही. दोन महिन्यांपूर्वी नवीन जिल्हा इस्पितळातही कोविड इस्पितळ सुरु झाले. त्याशिवाय सासष्टीत कोविड रुग्णांची काळजी घेणारी सर्वाधिक निगा केंद्रे होती. 

कोविड रुग्णांचा मृत्यू झाला तेव्हा अंत्यसंस्कारावरून दोन ठिकाणी वाद झाला. अशा प्रसंगी सर्व जाती धर्माच्या (मृत) कोविड रुग्णांसाठी मडगाव स्मशानभूमीची दारे मठग्राम हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग (भाई) नाईक यांनी खुली केली. कोणत्याही मृत कोविड रुग्णाची परवड होऊ न देण्यासाठी नाईक यांनी ही भूमिका घेतली. कोविडमुळे सांस्कृतिक क्षेत्रात सातआठ महिने सामसूम होती. मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्षपद दामू नाईक यांना बहाल करण्यात आल्याने मडगावात पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या