girish chodankar 1.jpg
girish chodankar 1.jpg

महामारीतही भाजपा आमदार मालामाल होण्याची संधी शोधताहेत : गिरीश चोडणकरांचा आरोप 

सासष्टी : कोरोना व्हायरसची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक विध्वंसक होत चालली असून अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देणारे काम करण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्य मंत्रिमंडळ, भाजप आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी हे सगळे कोविड १९ आजाराचा बाजार करीत आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar)  यांनी केला. सरकार अंतर्गत अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर आला असून मंत्री व आमदार त्यामुळेच एकमेकांना दोष देत आहेत. कमिशन उकळणे हाच भाजप सरकारचा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याने गोमंतकीय जनता मात्र दरिद्री होत चालली आहे. आॕक्सिजन, औषधे, खाटा, जीवरक्षक सुरक्षा प्रणाली आणि कोविड लसीकरणाअभावी लोकांचे हाल होत असताना सत्ताधारी भाजपचे आमदार केवळ संकटात मालामाल होण्याची संधी शोधत आहेत, असे चोडणकर यांनी सांगितले. (Even in the epidemic, BJP MLAs are looking for opportunities to become rich)  

राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडलेली असताना ती वेळीच सावरण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant)  हे आयाराम गयाराम वृत्तीच्या बाबूश मोन्सेरात सारख्या आमदारासोबत तासन् तास चर्चा करून वेळ वाया घालवत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात खाटांची कमतरता भासत असून इस्पितळात दोन मजले उपलब्ध असताना ते उपयोगात का आणले जात नाहीत. स्थानिक आॕक्सिजन पुरवठादारांना आरोग्य खात्याने अचानक पुरवठा थांबविण्यास का सांगितले आणि सर्व शासकीय इस्पितळातील डॉक्टर व परिचारिकांवर कामाचा ताण का वाढवला जात आहे, याची उत्तरे आरोग्य खात्याने दिली पाहिजे, असे चोडणकर यांनी सांगितले. कोविड काळात लोक आॕक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, खाटा आणि लसीकरणासाठी धावाधाव करत असताना सत्ताधारी भाजपचे नेते त्रस्त जनतेला कसलाही दिलासा देताना दिसत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोरोना महामारीच्या काळात अचानक  प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करणे धक्कादायक आहे. सरकारला हे अधिकारी पैसा मिळविण्याच्या मोहिमेत सत्तेच्या शेवटच्या दिवसापर्यंत हवे आहेत. जे यात सहकार्य करत नाहीत, त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. सर्व  शासकीय यंत्रणेला सावध करू इच्छितो की त्यांनी यासाठी मंत्री व आमदारांच्या दबावाखाली येऊ नये. काँग्रेस  पक्षाचे या सर्व हालचालीकडे बारीक लक्ष आहे, हे संबंधितांनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही चोडणकर यांनी दिला.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com