आर्थिक संकटातही सरकारकडून उधळपट्टी - चोडणकर

विलास महाडिक
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

राज्य कोविड महामारीमुळे आर्थिक संकटात असताना मुख्यमंत्र्यांनी नव्या प्रकल्पांच्या कामांना मंजुरी देत उधळपट्टी चालविली आहे. नव्या राजभवनाच्या प्रस्तावाला राज्यपालांनी सरकारला चपराक दिली. यावरून राज्यपालांची मंजुरी घेतली नव्हती हे उघड झाले. उपमुख्यमंत्र्यांसाठी नव्या बंगल्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे राज्यपालांना या उधळपट्टीला लगाम घालण्यास हस्तक्षेप करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

पणजी

राज्य कोविड महामारीमुळे आर्थिक संकटात असताना मुख्यमंत्र्यांनी नव्या प्रकल्पांच्या कामांना मंजुरी देत उधळपट्टी चालविली आहे. नव्या राजभवनाच्या प्रस्तावाला राज्यपालांनी सरकारला चपराक दिली. यावरून राज्यपालांची मंजुरी घेतली नव्हती हे उघड झाले. उपमुख्यमंत्र्यांसाठी नव्या बंगल्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे राज्यपालांना या उधळपट्टीला लगाम घालण्यास हस्तक्षेप करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
राजभवनाचे कॅसिनो भवनात रूपांतर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव उघड केल्यानंतर राजभवनाने काल जारी केलेल्या खुलाशाने सदर प्रस्ताव सरकारने स्वतःच घेतला होता हे उघड झाले. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे प्रधानमंत्री कार्यालय, गृहमंत्री अमित शहा की कॅसिनो सम्राटाकडून आला होता हे जनतेसमोर स्पष्ट होणे गरजेचे आहे. राज्यपालानी नवीन राजभवन प्रस्ताव कोणाकडून आला व त्यासबंधी कागदोपत्री मंजुरी घेण्यात आली होती का याचे स्पष्टीकरण देण्याचे मुख्यमंत्र्याना आदेश देणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्य सध्या कोविड महामारीमुळे आर्थिक संकटातून जात आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी सरकार चाचपडत आहे अशा स्थितीत
गोव्यातील असंवेदनशील भाजप सरकारने उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या बंगल्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले असल्याचा गौप्यस्फोट गिरीश चोडणकर यांनी करून दिवाळखोरीत असलेल्या सरकारची ही उधळपट्टी राज्यपालांनी थांबवावी व असल्या सर्व प्रकल्पांना लाल झेंडा दाखवावा अशी विनंती केली आहे.
मुख्यमंत्र्यानीच स्थापन केलेल्या राज्य आर्थिक पुनरुज्जीवन समितीने नवीन राजभवन प्रकल्पास मान्यता दिली होती का व सरकारचे धोरण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे की सरकारी पैशाची उधळपट्टी करण्याचे आहे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे असे चोडणकर यांनी मत व्यक्त केले आहे.
राज्यपालांनी जारी केलेल्या पत्रकाने भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी योग्य बोध घेतला असेल असा टोमणा गिरीश चोडणकर यांनी मारला आहे. गोव्यातील राजभवनासह सर्व सरकारी मालमत्ता या भाजपच्या खासगी मालमत्ता असल्याच्या थाटात त्यांची विक्री करण्याचा डाव भाजप आखत आहे. काँग्रेस पक्षाने हा कुटील डाव उघड केल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तानावडे यांनी माझ्याविरुद्ध बेताल आरोप करून आता आपलेच हसे करून घेतले आहे असा टोला गिरीश चोडणकर यांनी लगावला आहे. भाजप सरकारला कोविड हाताळणीत आलेले अपयश आता उघड दिसत असून, मृतांचा आकडा पन्नास पार झाला आहे. राज्यपालानी परत एकदा सर्व सबंधितांची बैठक बोलवावी व कोविडचा सामना करण्यासाठी एक कृतिदल स्थापन करावे अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

संपादन ः संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या