तराजू न धरलेलेही झाले दुकानदार, व्यावसायिक

प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

मासळी, भाजीपाला विक्रीवर भर, मात्र बेरोजगारांची संख्या जास्तच

फोंडा: कोरोनाच्या महामारीमुळे सबंध जगावर विपरित परिणाम झाला आहे. फर्मास्युटिकल सोडले तर इतर बहुतांश उद्योग व्यवसायांवर गंडांतर आले आहे, त्यामुळे अशा कंपन्यांत कामाला असलेल्या लोकांची रोजीरोटीच हिरावली गेली आहे. फोंडा तसेच लगतच्या खाण भागातही नेमकी हीच स्थिती आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना रोजगारीची प्रतीक्षा असून काहीजणांनी तर स्वयंरोजगारावर भर देताना विशेषतः मासळी विक्री तसेच भाजीपाला विक्रीवर भर दिला आहे. काहीजणांनी स्वरोजगार स्विकारला तर काहीजणांनी लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या काही आस्थापनात रोजंदारीचे काम स्विकारले आहे. तरीपण अजूनही बरेच लोक रोजगाराच्या प्रतीक्षेतच आहेत. 

कोरोना काळात लॉकडाऊन केल्यानंतर लोकांची भाजीपाला तसेच कडधान्य आणि माशांसाठी मारामार झाली. नंतरच्या काळात स्थिती हळूहळू पूर्वपदावर आली खरी पण लॉकडाऊन काळात ज्यांनी कधी तराजूला स्पर्शही केलेला नाही, ते लोक दुकानदार झाले. कडधान्य विक्रीबरोबरच भाजीपाला, फळे आणि मासळी विक्रीचा व्यवसाय काही लोकांनी स्विकारला. 

रोख रुपये कमावण्याचा आणि फक्त अर्धा दिवस काम करण्याचा मस्त व्यवसाय म्हणून मासळी व्यवसायाकडे पाहिले जाते. पहाटे मडगावला घाऊक मासळी विक्री बाजारात जायचे, तेथून मासळी खरेदी करायची आणि दुपारपर्यंत अव्वाच्या सव्वा दराने ही मासळी लोकांच्या गळी उतरवायची, संध्याकाळी मस्त आरामा करायचा असा हा धंदा आहे. त्यातही विशेष गोम म्हणजे मासेप्रेमी लोकांकडून कितीही महाग झाले तरी मासे हे खरेदी केले जातातच, त्यामुळे उधारी नसलेला जाग्यावरच रोखड मिळवून देणारा हा व्यवसाय लोकांनी स्विकारला असून त्यात युवा वर्गही सामील झाला आहे. 

फोंडा तालुका भागात अनेक ठिकाणी मासे विक्रेते तयार झाले आहेत. केवळ फोंडाच नव्हे तर फोंड्याला लागून असलेल्या खाणव्याप्त भागातही हा मासे विक्रीचा धंदा तेजीत चालत आहे. एखादी कारगाडी किंवा व्हॅन घ्यायची, त्यातून हे मडगावला जाऊन पहाटे मासळी आणायची आणि रस्त्याच्या कडेला ही गाडी थांबवून ही मासळी विकायची असे या धंद्याचे सध्या स्वरूप झाले आहे. फोंड्यात मासळी मार्केट असूनही त्यात केवळ ठराविक लोकच मासे विक्री करीत असून या ठिकाणीही पूर्वीची स्थिती राहिलेली नाही. गोमंतकीय मासे विक्रेत्यांची संख्या कमी झाली असून बिगर गोमंतकीय लोकांनी त्यांच्या जागा पटकावल्या आहेत. काही गोमंतकीयांनी तर मार्केटमधील आपली जागा भाडेपट्टीवर दिली आहे, त्यामुळे बसून भाडे वसूल करण्याचा हा पर्याय काही गोमंतकीय मासे विक्रेत्यांनी स्विकारला आहे. 

फोंडा शहर तसेच तालुक्‍याच्या विविध भागात मोक्‍याच्या ठिकाणी मासे विक्रेते बसलेले आढळतील. माशांच्या दरात कधीच एकवाक्‍यता राहिलेली नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा दर लावून ही मासेविक्री केली जाते. मत्स्यप्रेमीच्या ताटात एक तरी माशाचा तुकडा हवाच, त्यामुळे दर महागडे असले तरी गोमंतकीय मत्स्यप्रेमी अव्वाच्या सव्वा दर असूनही हे मासे खरेदी करतो. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील काही लोकांनी तर भाजीपाला आणि फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. गावठी भाजी आणि फळे मोठ्या प्रमाणात विकत घ्यायची आणि ती मिळेल तेथे गाडे थाटून ही भाजी व फळे विकायची असा क्रम सध्या काहीजणांनी ठेवला आहे. फोंड्यात बुधवारपेठ बाजारात बुधवारी व शनिवारी असे दोन दिवस आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारात तालुक्‍यातील विविध ग्रामीण भागातून भाजीपाला व फळे उपलब्ध केली जातात. पहाटे घाऊक विक्री बाजार सुरू होतो. पहाटेच्या वेळेला भाजीपाला तसेच फळांच्या गाड्या येतात व नंतर हा भाजीपाला व फळे विकत घेण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांची गर्दी होते. पूर्वी या विक्रेत्यांची संख्या तशी मर्यादित होती, पण आता लॉकडाऊन काळात ही संख्या वाढली आहे.

दिलासा मिळाला पण...
फोंडा तालुक्‍यातील एक भाग तसेच लगतच्या तालुक्‍यात खाण उद्योग चालतो. सध्या खाणी बंद असल्या तरी लॉकडाऊन काळात सुरवातीला लिलावाचा खनिज माल निर्यात करण्यासाठी व नंतर खाणींवर काढून ठेवलेला आणि ज्याचे स्वामित्वधन अदा केले आहे, असा खनिज माल वाहतुकीसाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे खाणव्याप्त भागातील बऱ्याच ट्रकमालक तसेच इतरांना दिलासा मिळाला. पण सध्या हे काम बंद आहे. येत्या ९ सप्टेंबरला खाणीसंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने त्याकडे आता खाण भागातील लोकांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे सर्वच उद्योग व्यवसायांवर परिणाम झाला. मी कुंडई येथील एका प्रकल्पात काम करायचो, पण तेथून मला कामावरून काढून टाकण्यात आले. आता गावातील भाजीपाला तसेच फळांची विक्री करून रोजीरोटी चालवतो.
- प्रदीप नारायण गावकर (तिस्क - उसगाव)

लॉकडाऊनमुळे रोजीरोटी हिरावली गेली. त्यामुळे आम्ही मासे विक्रीचा पर्याय स्विकारला. आता आमचा व्यवसाय व्यवस्थित चालतो. 
- राजाराम सूर्या नाईक (पिळये - धारबांदोडा)

 

संबंधित बातम्या