कोविड’वर सर्वांनीच विजय मिळवावा : डॉ. नाईक

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

कोरोना’पासून प्रत्येकांनी आपला बचाव करून घेण्यासाठी नाक, घसा याबरोबरच वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवून इतरांच्या संपर्कापासून दूर रहावे. सामाजिक अंतर ठेवून व्‍यवहार करणे गरजेचे आहे.

बोरी: कोरोना’पासून प्रत्येकांनी आपला बचाव करून घेण्यासाठी नाक, घसा याबरोबरच वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवून इतरांच्या संपर्कापासून दूर रहावे. सामाजिक अंतर ठेवून व्‍यवहार करणे गरजेचे आहे. या ‘कोविड’वर आपणाला सर्वांना  विजय मिळवायचा आहे,  असे प्रतिपादन डॉ. लक्ष्मीकांत नाईक यांनी केले. 

तळावली येथील बालकल्याण आश्रमात  रविवारी लायन्स क्लब हिलटाऊन फोंडाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. नाईक हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष विवेकानंद नाडकर्णी, प्रसाद प्रभुगांवकर, अनुपा नाडकर्णी, विभागीय अध्यक्ष बाळकृष्ण प्रभुदेसाई, सागर साकोर्डेकर, अनिल महाबळ, स्वप्नील भोगवत आदी मान्यवर उपस्थित होते. 

क्लबतर्फे बालकल्याण आश्रमातील मुलांसाठी गणपती चित्रकला स्पर्धा तसेच आरती स्पर्धा घेण्यात आली. त्यातील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेली विवेकानंद नाडकर्णी यांच्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाल्यामुळे डॉ. नाईक यांच्या हस्ते त्यांचा भेटवस्तू शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. 

विवेकानंद नाडकर्णी यांनी स्वागत केले. प्रसाद प्रभुगावकर यांनी सूूत्रसंचालन केले. अनुपा नाडकर्णी यांनी आभार मानले.

 

संबंधित बातम्या