युवा शेतकरी देवेंद्र गावस यांचा प्रयोग : केरीत लसूण, भोपळ्याची यशस्वी लागवड

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

अन्य विविध भाजीपाल्‍याचेही उत्‍पादन

वाळपई : सत्तरी तालुक्यात केरी घोटेली येथील युवा शेतकरी देवेंद्र गावस यांनी आपल्या बागायतीत विविध भाजीपाला तसेच केळी, सुपारी आदी पिकांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र यांनी लसूण, भोपळा पिकाची पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्‍वावर यशस्वीपणे लागवड केली आहे. यावर्षी एप्रिल, मे महिन्यात भोपळा, लसूण पिकाची लागवड केली होती. ती आता चांगली धरली आहे. 

भोपळा या फळभाजीचा आकार भलामोठा बनला आहे. लगडलेले भोपळ्याचे फळ वेलीतून तुटुन जमिनीवर पडणार नाही यासाठी भोपळा भाजी फळाला घालून आधार देण्यासाठी विशेष सोय करण्‍यात आली आहे. बागायतीत पूरक पीक उत्‍पादन म्‍हणून केळी, सुपारी पिकाचीही लागवड केली आहे. 

भाजीपाल्‍याचीही लागवड
देवेंद्र यांनी लाल भाजीपाला, मुळा, मका कणस, गड्डा, वाली, अळू माडी, केळी, भेंडी अशी अन्य पिकांचेही उत्‍पादन घेतले आहे. कलिंगड पिकही उन्हाळ्यात घेतले होते. या कामात देवेंद्र यांना त्‍यांचे भावोजी दिलीप गावस हे वेळोवेळी बागायती कामात मदत करतात. तसेच गावस कुटुंबही सहकार्य करीत आहे. 

काेरोना महामारीच्‍या कालावधीत बेरोजगार युवकांनी पडिक जमिनीत लागवड करण्‍याची तयारी दर्शवत आहे. काहीजणांनी प्रयत्‍नही सुरू करून उत्‍पादन घेणे सुरू केले आहे. सत्तरी तालुक्यात सद्य स्थितीत काही युवक वर्ग आपल्या बागायतीत अशी पिके घेत आहेत. 

लसूण लागवडीचाही प्रयोग
देवेंद्र गावस यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून भाजीपाला पिके घेत आहेत. देवेंद्रने यंदा लसूण पीक लहान प्रमाणात घेतले आहे. त्यामुळे सत्तरीत लसूण पीक होऊ शकते, हे लागवडीतून सिद्ध केले आहे. सत्तरीत अनेकांच्या जमिनी पडिक स्थितीत आहेत. रानटी प्राण्यांमुळे लोकांनी बागायती, शेती कामे करणे सोडून दिले आहे. पण अशा वन्यप्राण्यांच्या संकटातही देवेंद्र यांच्‍यासारख्या तरुणाने आपल्या मौलिक सुपिक जमिनीत बागायती पिके, भाजीपाला पिके घेतली आहे. त्यांनाही वन्यप्राण्यांचा त्रास होतो. तशातही गावस यांनी आपले बागायती काम कायम ठेवले आहे.

संबंधित बातम्या