‘बायोफ्लॉक तंत्रज्ञान’ फायदेशीर

‘बायोफ्लॉक तंत्रज्ञान’ फायदेशीर
Experiments have been started to produce fish by erecting tanks

पणजी: शेती व्यवसायाला पूरक असणाऱ्या मासेमारीकडे अधिकाधिक लोकांनी वळण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवित असते. देशातील ओडिशा, केरळ राज्यात यशस्वी झालेल्या ‘बायोफ्लॉक तंत्रज्ञाना’द्वारे केल्या जाणाऱ्या मासळी उत्पादनाकडे राज्यात हळहळू शेतकरी वळू लागले आहेत. कमीत कमी जागेत अधिक मत्स्य उत्पादन देणारे हे तंत्रज्ञान मासळी उत्पादनाकडे लोकांना आकृष्ट करू शकते.

राज्यात ४५ ठिकाणी मत्स्यपालन शेती केली जाते. मच्छिमार खात्याच्यावतीने मासळी विक्री व्यवसायासाठी जशा विविध योजना आहेत, तशा योजना मासळी उत्पादन करण्यासाठीही आहेत. परंतु सध्या इतर देशांत यशस्वी झालेल्या बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे मत्स्य शेतीकडे लोकांनी वळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अत्यंत कमी जागेत कमी गुंतवणूक करून आणि राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सवलतीचा फायदा घेऊन शेतकरी किंवा मत्स्य उत्पादन करण्यास उत्सूक असणाऱ्यांना ही पद्धत फायदेशीर ठरू शकते. 


पर्यावरणाला कोणतीही हानी न होता, कमीत कमी पाण्याचा वापर करून ‘बायोफ्लॉक तंत्रज्ञाना’द्वारे मासळीचे उत्पादन घेणे शक्य आहे. चार मीटर व्यासाची आणि दीड मीटर उंचीची लोखंडी जाळी व प्लास्टिक कागद, काँक्रिटचा वापर करून गोलाकार बांधल्या जाणाऱ्या टाकीत मासळी उत्पादन घेतल्यानंतर ती टाकी काढूनही टाकता येते. राज्यात सर्वात जास्त मागणी असलेल्या सुंगटे, चोणाक, तांबोशी अशा मासळीचे उत्पादन घेणे शक्य आहे. राज्य सरकारने या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले असून, राज्यातील काणकोण, सासष्टीत काही शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाद्वारे मासळी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. घराच्या बाजूला टाकीयोग्य जागा असेल, तर तेथेही उत्पादन घेणे शक्य होत आहे. केरळ व इतर ठिकाणी इमारतीमधील मोकळ्या जागेत अशा टाक्या उभारून मासळी उत्पादन घेण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे पाच ते सहा महिन्यात मासा अर्धा किलो वजनाचा होतो. त्यामुळे घरगुती उत्पादन घेतलेल्या मासळीची विक्री सुरवात केल्यास त्यास मागणीही जास्त असते. या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मासेमारी खात्याशी संपर्क साधणे आवश्‍यक आहे.

या तंत्रज्ञानाचे काय आहेत फायदे?
   इको फ्रेंडली कल्चर सिस्टम
  पर्यावरणाचा प्रभाव कमी होतो
  जमीन आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत सुधारणा
  मर्यादित किंवा कमीत कमी पाण्याचा विनियोग
  अधिक उत्पादन 
  उच्च जैव संरक्षण
  पाण्याचे प्रदूषण कमी करते आणि रोग जनकांचा प्रभाव कमी करण्यास        मदत
  प्रथिनेयुक्त खाद्य तयार करण्यास आणि तग धरून खर्च कमी करण्यास   मदत 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com