१०२ गुन्हेगारांवर तडिपारची टांगती तलवार 

विलास महाडिक
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राज्यात काही तरुण मुलेही गुन्हेगारांच्या टोळीमध्य सामील होत आहेत अशा १८ - २१ वयोगटातील तरुणांची यादी तयार केली जात आहे.

पणजी

राज्यातील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या सुमारे १०२ गुन्हेगारांची यादी तयार करून त्याना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. या पाठिवलेल्या प्रस्तावामध्ये उत्तरेतील ९० तर दक्षिणेतील १२ गुन्हेगारांचा समावेश आहे. प्रत्येक पोलिस स्थानकातून दहा गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली तर तिघा गुन्हेगारांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) कारवाई करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. 
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यातून ९० गुन्हेगारांची यादी तडीपारच्या कारवाईसाठी तयार करण्यात आली आहे. त्यात या जिल्ह्यातील डिचोली, पेडणे, हणजूण व वाळपई या पोलिस स्थानकात प्रत्येकी पाच गुन्हेगारांचा तर इतर पोलिस स्थानकात प्रत्येकी दहा गुन्हेगारांची नावे देण्यात आली आहेत. दक्षिणेत १२ गुन्हेगारांच्या नावाचा समावेश आहेत ते मडगाव, फातोर्डा, 
वास्को व वेर्णा या पोलिस स्थानकाच्या अधिकार क्षेत्रातील आहेत. उत्तर गोव्यात १२ तर दक्षिणेत १६ पोलिस स्थानके आहेत. या पोलिस स्थानकांमध्ये गुन्हेगारांशी संबंधित व त्यांच्या वारंवार कारवायासंदर्भातच्या चॅप्टर केसीसच्या फाईल्स तयार करण्यात आल्या आहेत. 
तडीपार कारवाईसाठी देण्यात आलेल्या प्रस्तावामधील सुमारे १०० गुन्हेगार या अनेक हल्लाप्रकरणात गुंतलेले आहेत. या प्रस्तावानुसार 
जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याना नोटिसा बजावण्यात येतील व त्यानंतर त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. जर पोलिसानी मांडलेली बाजू समाधानकारक असल्यास या गुन्हेगारांना तडिपार करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून निघू शकतो. मात्र या सुनावणीला बराच वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही पोलिसांनी गुन्हेगारांच्या तडिपारसाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी वर्षानुवर्षे जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित राहिली आहे. सांताक्रुझ टोळीयुद्धसारख्या घटना टाळण्यासाठी या प्रस्तावावर प्राधान्यक्रमाने सुनावणी घेण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली जाणार आहे, असे या अधिकाऱ्याने मत व्यक्त केले. 
दरम्यान, राज्यात काही तरुण मुलेही गुन्हेगारांच्या टोळीमध्य सामील होत आहेत अशा १८ - २१ वयोगटातील तरुणांची यादी तयार केली जात आहे. भविष्यात हे तरुण अट्टल गुन्हेगार बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या तरुण गुन्हेगारांना त्यांच्या पालकांना पोलिस स्थानकात बोलावून समुपदेशन करण्याबरोबरच त्यांची जबाबदारी घेण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. 
दरम्यान, सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील मुख्य संशयित मार्सलिनो डायस व रोनी डिसोझा या दोघांविरुद्ध तसेच दक्षिणेतील एका गुन्हेगाराविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली. 
 

 
 

संबंधित बातम्या