बनावट नोटाप्रकरण: मुख्य सूत्रधार नारायण सिंग गजाआड

प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

मध्यप्रदेशमध्ये पणजी पोलिस पथकाची यशस्वी कारवाई

पणजी:  बनावट चलनी नोटाप्रकरणातील मध्यप्रदेशचा मुख्य आरोपी नारायण सिंग (३६ वर्षे) याला पणजी पोलिस पथकाने अटक केली. त्याला गोव्यात आणून न्यायालयाकडून दहा दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चंदिगडच्या पाचजणांना अटक केल्यावर या आरोपीचे नाव उघड केले होते. त्यामुळे संशयित राजदीप सिंग याला सोबत घेऊन पणजी पोलिस चंदिगडला गेले होते. राज्यात बनावट चलनी नोटा व्यवहारात आणल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पणजी पोलिसांनी चंदिगडहून गोव्यात आलेल्या पर्यटकांना कळंगुट येथील एका हॉटेलातून अटक केली होती. सुमारे दोन लाखांहून अधिक १००, २०० व २००० रुपयांच्या बनावट चलनी नोटा संशयित राजदीप सिंग, गगनदीप सिंग, हरजीत सिंग, राहुल लुथ्रा व अनुराग कुमार यांच्याकडून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. न्यायालयाने या सर्वांना आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यांची कोठडी आज संपल्याने न्यायालयाने आणखी पाच दिवस कोठडी वाढवून दिली आहे. 

या बनावट चलनी नोटा त्यानी चंदिगड येथून नारायण सिंग याच्याकडून घेतल्याचे चौकशीत उघड केले होते. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक अजित उमर्ये यांच्या नेतृत्वाखाली पणजी पोलिस पथक चंदिगडला गाडीन गेल्या आठवड्यात गेले होते. त्यानंतर हे पथक मध्यप्रदेश येथून संशयिताला घेऊन गोव्यात परतले. त्यामुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या सहा झाली आहे. 

संशयितांनी कळंगुट, पर्वरी, म्हापसा, पणजी तसेच किनारी भागात फिरताना तसेच गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बनावट नोटांचा वापर केला होता. गोव्यात या नोटा सहजपणे वापरात आणणे शक्य असल्याने संशयितांनी गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला. सोबत पत्नी व मुले असल्याने कोणालाही त्याचा संशय येणार नाही याचा फायदा त्यांनी घेऊन या नोटा व्यवहारात वापरत होते.

संबंधित बातम्या