बनावट नोटा प्रकरण: संशयितांची आयबीकडून चौकशी

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

स्रोताच्या शोधार्थ पोलिस पथक संशयितासह चंदिगढला 

पणजी: बनावट चलनी नोटाप्रकरणी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी (आयबी) पाचही संशयितांची चौकशी केली तर पणजी पोलिस पथक काल रात्री उशिरा एका संशयिताला घेऊन चंदिगढला या मागील स्रोतचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. संशयितांनी दिलेल्या जबानीत या बनवाट नोटा त्याना चंदिगढ येथील एका व्यक्तीने दिल्याचे उघड केले आहे. बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणारे आंतरराज्य रॅकेट असून या संशयितांचा त्यात कितपत हात आहे याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली. 

पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अजित उमर्ये यांच्या नेतृत्वाखालील पाच जणांचे पोलिस पथक चंदिगढला गेले असून सोबत संशयित राजदीप सिंग याला नेण्यात आले आहे तर इतर चार संशयित गगनदीप सिंग, हरजित सिंग, अनुराग कुमार व राहुल लुथ्रा हे पोलिस कोठडीत आहेत. न्यायालयाने या सर्व संशयितांना आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. 

बनावट चलनी नोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सखोल तपास होण्याची शक्यता आहे. अजूनही ही यंत्रणा गोव्यात आली नाही मात्र गोव्यातील गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करून माहिती जमा केली आहे ती राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पाठवली जाणार आहे. संशयितांनी बनवाट चलनी नोटांचा वापर गोव्यात कोणकोणत्या ठिकाणी केला आहे याचा तपास करत आहे. संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलेला नाही. त्यांच्याविरुद्धचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. टोंक करंझाळे येथील एकच तक्रार सध्या दाखल झालेली आहे. सध्या अटक केलेल्या या पर्यटकांचे चेहरे उघड झाल्यावर तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

संशयित या बनवाट चलनी नोटा ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असते अशा ठिकाणी त्या खपविण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या सात दिवसांत त्यांनी राज्यातील अनेक भागात चंदिगढ येथून येताना घेऊन आलेल्या वाहनाने फिरले आहेत. अलिशान हॉटेलात न जाता सर्वसाधारण हॉटेल्समध्ये गेले आहेत. पैसे देताना कॅशियरचे लक्ष नोटांवर जाऊ नये म्हणून त्याच्याकडे बोलत त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न संशयित करायचे. या बनावट नोटा त्यानी चंदिगढ येथून एका व्यक्तीकडून घेण्यात आल्याचे राजदीप सिंग याने पोलिसांना सांगितले goa

संबंधित बातम्या