बनावट चलनी नोटांचे स्रोत चंदिगढमध्ये; पाच संशयितांना ८ दिवस पोलिस कोठडी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

संशयितांनी बनावट नोटा चंदिगढ येथून ज्या व्यक्तींकडून घेतल्या होत्या त्याची नावेही उघड केली आहेत. त्यामुळे पणजी पोलिस पथक उद्यापर्यंत रवाना होणार आहे. संशयित ज्या गाडीने गोव्यात आले होते ती ताब्यात घेण्यात आली आहे. 

पणजी: बनावट चलनी नोटाप्रकरणी अटक केलेल्या चंदिगढ येथील पाच पर्यटक संशयितांना आठ दिवसांची पोलिस कोठडी पणजी न्यायालयाने दिली. या संशयितांनी बनावट नोटा चंदिगढ येथून ज्या व्यक्तींकडून घेतल्या होत्या त्याची नावेही उघड केली आहेत. त्यामुळे पणजी पोलिस पथक उद्यापर्यंत रवाना होणार आहे. संशयित ज्या गाडीने गोव्यात आले होते ती ताब्यात घेण्यात आली आहे. 

बनावट नोटा प्रकरणांचा तपास ‘एनआयए’ ही यंत्रणा करते त्यामुळे त्याची माहिती त्यांना दिली जाणार आहे. यासंदर्भात या यंत्रणेशी उच्च स्तरावरून संपर्क साधण्यात आला आहे. संशयितांची नावे राजदीप सिंग, गगनदीप सिंग, हरजीत सिंग, राहुल लुथ्रा व अनुराग कुमार अशी आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्‍या चलनी नोटा बनावट असल्याचे माहीत होते, असे प्रथमदर्शनी चौकशीत उघड केले आहे. या बनावट नोटा चंडिगढ येथूनच काही व्यक्तींकडून घेऊन गोव्यातील प्रवेश खुला झाल्याने मौजमजा करण्यासाठी आले होते. कळंगुट येथील हॉटेलमधील आरक्षण ऑनलाईन पद्धतीने केले होते. मात्र, त्याचे अर्धेच बिल चुकते केले होते व उर्वरित बिल बनावट नोटांचा वापर करून फेडून येत्या तीन दिवसांत ते परतणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात ते अडकले.  

बनावट नोटांद्वारेच भरले गाडीत इंधन
संशयितांनी गोव्‍यात येताना पंजाब रजिस्ट्रेशनची स्कॉर्पिओ गाडी घेऊन आले होते. येताना गाडीमध्ये इंधन तसेच खाण्यापिण्यासाठी या बनावट नोटांचा वापर केला. गोव्यातही त्यांनी या नोटांचा व्यवहार केला आहे. मात्र, पणजीतील टोंक करंझाळे येथील एका आईस्क्रिम पार्लर मालकाने दिलेल्या तक्रारीत व्यतिरिक्त आणखी तक्रार आलेली नाही. 

...म्‍हणून कुटुंबालाही सोबत आणले!
पोलिसांनी या संशयितांचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्यातील व्हॉट्‍सॲप मेसेज तसेच फोन कॉल्स याची पडताळणी सुरू आहे. गोव्यात बनावट नोटा सहजपणे वापरात आणणे शक्य असल्याने संशयितांनी गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला. सोबत कुटुंब असल्याने कोणालाही त्याचा संशय येणार नाही. त्यामुळे संशयितांनी सहकुटुंब गोव्यात आले होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या