तीन लाखांच्‍या बनावट नोटा जप्‍त; कळंगुटमध्ये ५ पर्यटक गजाआड

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

बनावट चलनी नोटाप्रकरणी पणजी पोलिसांनी आज कळंगुट येथील बॉलिवूड अभिनेत्‍याच्‍या मालकीच्या एका हॉटेलवर छापा टाकून चंदिगढ (पंजाब) येथील पाच पर्यटकांना अटक केली.

पणजी: राज्यातील पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असलेले कळंगुट हे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी ‘हॉटस्पॉट’ बनू लागले आहे. बनावट चलनी नोटाप्रकरणी पणजी पोलिसांनी आज कळंगुट येथील बॉलिवूड अभिनेत्‍याच्‍या मालकीच्या एका हॉटेलवर छापा टाकून चंदिगढ (पंजाब) येथील पाच पर्यटकांना अटक केली. या छाप्यावेळी २ लाख ९६ हजार ४०० रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच चौकशीसाठी सर्वांचे मोबाईल संच ताब्यात घेण्यात आले आहेत. या नोटा त्यांनी पणजी व पर्वरी भागात वापरल्याचे आढळून आले आहे. हे आंतरराज्य रॅकेट असल्याचा संशय असल्याने या प्रकरणाच्या तपासकामासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक गोव्यात चौकशीसाठी येण्याची शक्यता आहे. 

या बनावट चलनी नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संशयितांची नावे राजदीप, गगनदीप, हरजीत, राहुल व अनुराग अशी आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्‍या रकमेमध्ये १००, २०० व २००० रुपयांच्या चलनी नोटांचा समावेश आहे. हे सर्वजण चंदिगढ येथील असून त्यांच्यासोबत चौघा संशयितांच्या पत्नी तसेच तीन मुलांचा समावेश आहे. संशयितांविरुद्ध भादंसंच्या कलम ४८९ अ, ४८९ ब व ४८९ क खाली गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्यांना उद्या (१५ सप्टेंबर) पणजी न्यायालयात पोलिस कोठडी घेण्यासाठी उभे केले जाणार आहे. 

बाराजणांचे कुटुंब गोव्‍यात आले होते...
पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्यापूर्वी चंदिगढ येथील हे १२ जणांचे कुटुंब गोव्यात फिरण्यास स्वतःची गाडी घेऊन आले होते व कळंगुट येथील बॉलिवूड सिनेस्टार मालकीच्या हॉटेलमध्ये ते राहत होते. त्यामध्ये पाच पुरुष, चार महिला व तीन मुलांचा समावेश होता. त्यांनी दहा दिवसांचे या हॉटेलमध्ये आरक्षण केले होते. येत्या ३ - ४ दिवसांनी ते परतणार होते. 

तीन दिवस होते पोलिस मागावर
बनावट नोटा वापरात आणणाऱ्या पर्यटकांची सीसीटीव्ही फुटेजही त्‍या आईस्‍क्रिम पार्लर दुकानदाराने पोलिसांनी दिली होती व त्याच्या आधारे पणजी पोलिसांनी गेले तीन दिवस या पर्यटकांचा व त्यांच्या वाहनाचा शोध घेत होते. या पर्यटकांनी पर्वरी तसेच इतर भागातील पर्यटन स्थळांना भेटी दिल्या होत्या, तेथेही या बनावट चलनी नोटांचा वापर त्यांनी केला होता. त्यामुळे काही दुकानधारकांना या बनावट चलनी नोटांचा फटका बसला असला तरी कोणी पुढे आलेला नाही. 

आईस्‍क्रिम खाणे पडले महागात...
चंदिगढ येथून आलेले पर्यटक कुटुंब काही दिवसांपूर्वी आलेले टोंक - करंझाळे (पणजी) येथील एका आईस्क्रिम पार्लरमध्ये आले होते. त्यांनी सर्वांनी खाण्यासाठी आईस्क्रिम घेतले व बिल देण्यासाठी १०० रुपयांच्या चलनी नोटा दिल्या. पैसे देताना या कुटुंबातील सदस्य तेथील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करीत होते, जेणेकरून या नोटा बनावट असल्याचा संशय येऊ नये. हे पर्यटक निघून गेल्यावर त्यांनी बिल देण्यासाठी दिलेल्या १०० रुपयांच्या चलनी नोटा बनावट असल्याचे आईस्क्रिम पार्लर चालकाच्या लक्षात आले. त्यासंदर्भातची तक्रार त्याने पणजी पोलिसांत दाखल केली होती. 

आधी ठेवली पाळत आणि मारला छापा!
पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून व उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी पणजीतील गुप्तचर पोलिसांना किनारपट्टी भागात वाहनाचा क्रमांक व सीसी टीव्ही फुटेजची माहिती देऊन तपास करण्यास सांगितले होते. ज्या वाहनाच्या शोधात पणजी पोलिस होते, त्याचा शोध लागला. त्यानंतर या वाहनावर पोलिसांनी पाळत ठेवत आज संध्याकाळी उशिरा कळंगुट येथील एका हॉटेलात राहत असलेल्या या पर्यटकांच्या खोल्यांवर पणजी पोलिस पथकाने पूर्ण तयारीनिशी छापा टाकला. यावेळी उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई हेही घटनास्थळी गेले होते.

चलनी नोटा जप्‍त
या पर्यटकांमध्ये काही महिला व मुले असल्याने महिला पोलिसांच्या मदतीने त्यांची झडती घेण्यात आली. या पर्यटकांच्या सामानाची झडती घेण्यात आली त्यामध्ये बनावट चलनी नोटा आढळून आल्या. या नोटा त्यांना चंदिगढ येथील एका व्यक्तीने दिल्या होत्या, असे संशयितांनी प्रथमदर्शनी जबानीत दिली आहे. त्यांनी या बनावट नोटा गोव्यात मौजमजा करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न होता. या बनावट चलनी नोटांचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी हे आंतरराज्य रॅकेट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची माहिती पोलिसांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही दिली आहे.  

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या