पर्वरी मतदारसंघातील यादीमध्ये बोगस मतदार!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हे निवेदनवजा तक्रार स्वीकारून येत्या आठ दिवसात त्यासंदर्भातचा अहवाल देण्याचे आश्‍वासन दिले आहे. ही नावे मतदार यादीतून वगळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी पर्वरी मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीवेळी  बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसडण्याचा प्रयत्न झाला आहे.

पणजी- पर्वरी मतदारसंघातील मतदार यादीमध्ये सुकूर येथील बोगस मतदारांची नावे घुसवण्यात आल्याची तक्रारवजा निवेदन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे (सीईओ) दाखल केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. ही कारवाई झाली नाही, तर न्यायालयीन प्रक्रिया केली जाईल, असा इशारा तक्रारदार पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी आज दिला.
 

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हे निवेदनवजा तक्रार स्वीकारून येत्या आठ दिवसात त्यासंदर्भातचा अहवाल देण्याचे आश्‍वासन दिले आहे. ही नावे मतदार यादीतून वगळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी पर्वरी मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीवेळी  बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसडण्याचा प्रयत्न झाला आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी सुकूर पंचायतमधील एका प्रभागामध्ये सुमारे ११८ परप्रांतियांची मतदार यादीमध्ये बोगस नावे आहेत. ही नावे वाचणेही मुष्किल होत आहे. त्यांचा मतदार यादीमध्ये असलेल्या पत्त्यावर ते राहतही नाहीत. त्यांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्यापूर्वी त्यांनी दिलेल्या पत्त्याची पूर्ण शहानिशा करण्याची आवश्‍यकता असते मात्र ती करण्यात आली नाही. याप्रकरणी तक्रार सुकूर येथील कल्पना मोरजकर यांनी मामलेदारांकडे दाखल केली मात्र त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. एखादा परप्रांतीय भाडेपट्टीवर राहत असल्यास त्याचे नाव मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी घर मालकाचा ना हरकत दाखला सक्तीचा असतो. त्यामुळे जी ११८ नावे मतदार यादीत समावेश करण्यात आली त्याला या नियमाची बगल देत ऑनलाईन पद्धतीचा फायदा घेत करण्यात आली आहे. हा प्रकार मामलेदार, गटविकास अधिकारी किंवा प्रभागस्तरीय अधिकारी यापैकी कोणीतरी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याना फैलावर घेण्याची गरज आहे. हे पर्वरी मतदारसंघाच्या बाबतीत घडले असल्याने इतर मतदारसंघातही असे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित भागातील आमदार तसेच लोकप्रतिनिधीनी याची शहानिशा करण्याचे आवाहन आमदार खंवटे यांनी केले. 

सुकूर पंचायत ही भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये सुकूर पंचायतीला हाताशी धरून ही नावे घातली आहेत. त्यामुळे ही बनवेगिरीचे प्रकरण असल्याचे सिद्ध होते. याप्रकरणामागे किर्ती कुडणेकर व तिचे पती कार्तिक पेडणेकर असून ते जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्याची शक्यता असल्याने हे प्रकार करत असल्याचे सुकूर पंचसदस्य कल्पना मोरजकर यांनी आरोप केला होता, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या