गोव्यात कोरोना संसर्गात घट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

गोव्यात काल दिवसभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहेत. हे प्रमाण शंभरापेक्षा कमी नोंद होत असल्याने राज्यासाठी चांगली बाब ठरत आहे.

पणजी :  राज्यात काल दिवसभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहेत. हे प्रमाण शंभरापेक्षा कमी नोंद होत असल्याने राज्यासाठी चांगली बाब ठरत आहे. काल एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. गेल्या २४ तासांत ६६ रुग्ण बरे झाले आहेत व राज्यात त्याचे प्रमाण ९६.९१ वर पोहचले आहे. १०८५ नव्या चाचण्या करण्यात आल्या त्यात ५३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ५१ जणांनी गृह अलगीकरणासाठी परवानगी घेतली आहे. कोरोना संसर्गामुळे उपचार घेत असलेल्यांची संख्या कमी (८६५) झाली आहे.

राज्यात आतापर्यंत ५२ हजार ४५८ कोरोना संसर्ग रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ५० हजार ८३७ रुग्ण हे बरे झाले आहेत. नवे कोरोना संसर्ग रुग्ण कोविड इस्पितळात दाखल होऊन उपचार घेण्यापेक्षा गृह अलगीकरणात राहणे पसंत करत आहेत. आतापर्यंत गृह अलगीकरणात २७ हजार ७३१ जणांनी उपचार घेतले आहेत, तर १४ हजार ८३१ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. सध्या कोविड इस्पितळात तसेच कोविड उपचार केंद्रात २४ जण दाखल आहेत. आतापर्यंत ४ लाख २९ हजार ०२० जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरदिवशी सरासरी दीड हजार चाचण्या सरकारी इस्पितळे तसेच नगर व प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्या जात होत्या ते प्रमाण आता कमी झाले असून ते आता हजाराच्या आसपास आहे. 

आरोग्य संचालनालयाने जारी केलेल्या माहितीनुसार पणजी प्राथमिक आरोग्य केंद्र - ६८, पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र - ४४, मडगाव नगर आरोग्य केंद्र - १०१ तसेच फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत ३९ कोरोना संसर्ग उपचार घेत
 आहेत. 

‘लसी’मुळे ताप येणे साहजिक 
राज्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार आहे. गेल्या शनिवारी ज्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली, त्यातील अनेकांना ताप येऊन अंग दुखण्याचे प्रकार घडू शकतात हे साहजिक आहे. अशाप्रकारची लस घेतल्यास २४ तास तो जोर असतो. मात्र, त्यानंतर तो कमी होतो. जर एखाद्याचा ताप उतरला नाही, तर त्याने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करून घ्यावेत, अशी माहिती कोविड इस्पितळ संबंधित डॉक्टरांनी दिली.

संबंधित बातम्या