वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिर :सामाजिक एकोपा टिकवणारा आगोंदचा ‘श्रीगणेश’

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

आगोंद येथील सर्व समाजाच्या घटकांना समावून घेऊन माजी मंत्री संजय बांदेकर यांच्या पुढाकाराने उभारलेले श्रीगणेश मंदिर येथील सर्व समाजाचा एकोपा साधणारे धर्मस्थळ बनले आहे

काणकोण: आगोंद येथील सर्व समाजाच्या घटकांना समावून घेऊन माजी मंत्री संजय बांदेकर यांच्या पुढाकाराने उभारलेले श्रीगणेश मंदिर येथील सर्व समाजाचा एकोपा साधणारे धर्मस्थळ बनले आहे. कोमुनिदाद संस्थेच्या ज्या जागी आज हे मंदिर उभे आहे, त्या ठिकाणी गावातील युवक दरवर्षी सत्यनारायण पूजेचे आयोजन करून नाटकाचे सादरीकरण करत. या युवकांमध्ये माजी मंत्री दिवंगत संजय बांदेकर यांचा समावेश असे. कधी नाटकात कलाकार म्हणून तर संगीत नाटकांना संगीत साथ देण्यासाठी ते या युवकाबरोबर सक्रिय असत. याच युवकांनी एकत्र येऊन या ठिकाणी गणेश मंदिर उभारण्याचा विचार पुढे आणला. त्या विचारांना बांदेकर यांनी चालना दिली. देसाई, वेळीप, मराठा, क्षत्रिय पागी समाजातील घटकांनी देऊळ उभारणीत वाटा उचलला त्यासाठीच आगोंद वासीयांना ते आपले मंदिर वाटते. १९९७ साली या मंदिराची स्थापना करण्यात आली. देवालयात संगरमरवरी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे, त्याशिवाय धातूची उत्सवमूर्ती आहे. देवालयात प्रत्येक विनायकी, संकष्टी हे दिवस साजरे करण्यात येतात.

त्याशिवाय गणेश जयंतीचा विशेष तीन दिवसांचा उत्सव असतो. गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी देवालयाचा वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे परंपरेप्रमाणे सत्यनारायण महापूजा व नाटकाचे आयोजन करण्यात येते, असे देवालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद नाईक गावकर, सचिव सुदेश देविदास व खजिनदार संतोष बांदेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या