वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिरे: भालखाजन - कोरगावातील श्रीगणेश मंदिर

प्रकाश तळवणेकर
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

भालखाजन - कोरगाव येथील श्री गणपती मंदिर पेडणे परिसरातही प्रसिद्ध आहे. येथील नाग गावडा मंदिर व गणपती मंदिराचा कारभार सलंग्न असून या देवस्थानानाचे विद्यमान अध्यक्ष हे गिरिधर गावडे हे आहेत. 

पेडणे भालखाजन - कोरगाव येथील श्री गणपती मंदिर पेडणे परिसरातही प्रसिद्ध आहे. येथील नाग गावडा मंदिर व गणपती मंदिराचा कारभार सलंग्न असून या देवस्थानानाचे विद्यमान अध्यक्ष हे गिरिधर गावडे हे आहेत. 

१९९४ च्या सुमारास वाड्यावरील रोहिदास भाटलेकर यांची बस होती. रात्रीच्यावेळी बस मुक्कामास त्यांच्या घरी येत असे. बसच्या येण्या - जाण्याने कच्च्या रस्त्याची माती विस्कटून तिथे एक सुमारे बारा सेंटीमिटरची पाषाणी मूर्ती दिसली. मूर्ती गणपतीची होती. ती सापडल्‍यावर स्‍थानिकांना आनंद झाला. मूर्ती स्‍वच्‍छ धुवून जवळच्या पेडावर ठेवण्यात आली. गणपतीची मूर्ती मिळाल्याने येथे गणपतीचे मंदिर बांधण्याचे वाड्यावरील लोकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. मंदिराचा मंडप बांधून झाला आणि काही कारणास्तव सुमारे सतरा वर्षे मंदिर बांधकाम अर्धवट राहिले. त्यानंतर २००९ मध्‍ये मंदिराचे काम पुन्‍हा सुरू होऊन २०१० मध्‍ये बांधकाम पूर्ण झाले. 

मध्यम आकाराच्या मंदिराचे आकर्षक डिझाईन व मंदिराची रंगरंगोटी केल्याने ते सुंदर दिसते. मंडपावरील शिव - पार्वतीच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. वेर्णे येथील पुट्टास्वामी गुडीगर या मूर्तिकाराने घडविलेली पाषाणी मूर्तीची प्रतिष्ठापना एप्रिल २०१० मध्ये करण्‍यात आली. 

धार्मिक कार्यक्रम
या मंदिरात दर मंगळवारी रात्री भजन, विनायकी, संकष्टी निमित्त पूजा व अभिषेक होतात. गणेश जयंती हा या मंदिरात मोठ्या थाटात साजरी होते. नाग गावडा मंदिर व गणपती मंदिर मिळून दोन्ही मंदिरांचा वाढदिवस चैत्र कृष्ण दशमीला (एप्रिल -  मे महिन्यात) एकत्र साजरा करण्यात येतो. या निमित्त सकाळपासून धार्मिक विधी, महाप्रसाद, भजन, फुगड्या, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग असे भरगच्च कार्यक्रम होतात. मंदिरात होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना विविध भागातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. 

उंदीर मूर्तीची यंदा प्रतिष्‍ठापना
उंदीर हे गणपतीचे वाहन. पण, गणपती मूर्ती सोबत उंदीराच्‍या मूर्तीची स्थापना राहून गेली होती. ही उणीव मंदिरात यंदा जुलै महिन्यात उंदराच्या मोठ्या मूर्तीची मूषक प्राणप्रतिष्ठापना करण्‍यात आली. चतुर्थीपासून सतत सात दिवस रोज दुपारी आरती व रात्री भजन होते. गणेशभक्तांची या मंदिरात रोज वर्दळ असते.

संबंधित बातम्या