वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिरे: खांडोळ्यातील प्रसिद्ध श्री महागणपती मंदिर

संजय घुग्रेटकर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

देवभूमी म्हणून गणल्या जाणाऱ्या गोमंतकभूमीतील "माशेल-खांडोळा '' या पुण्यक्षेत्राची महती विशेष आहे. या पंचक्रोशीत विविध देवदेवता अशा काही दाटीवाटीने निवासाला आहेत, की एखाद्याला वाटावे, इथे माणसांपेक्षा देवतांचे वास्तव्यच अधिक आहे.

खांडोळा: देवभूमी म्हणून गणल्या जाणाऱ्या गोमंतकभूमीतील "माशेल-खांडोळा '' या पुण्यक्षेत्राची महती विशेष आहे. या पंचक्रोशीत विविध देवदेवता अशा काही दाटीवाटीने निवासाला आहेत, की एखाद्याला वाटावे, इथे माणसांपेक्षा देवतांचे वास्तव्यच अधिक आहे. खांडोळा परिसरात प्रसिद्ध श्री गणपती मंदिर, श्री शांतादुर्गा मंदिर, श्री भगवती मंदिर असून याशिवाय इतरही मंदिरे आहेत. माशेल  एकमुखी दत्त ( श्रीदुर्गादत्त मंदिर), देवकी मातेसोबत गोपालकृष्ण ( श्रीदेवकीकृष्ण) अशी वैशिष्ट्यपूर्ण देवळेंही आहेत. केवळ श्री शांतादुर्गेचीच म्हटली तर तब्बल पाच - सहा मंदिरे  गावात आहेत. 

सध्याच्या काळात श्रीगणपती देवस्थान जे खांडोळा येथे आहे, ते देवस्थान प्राचीनकाळी दिवाडी बेटावरील नावेली या भागात होते. या देवालयाचे स्थलांतर नावेलीहून फोंडा तालुक्‍यात खांडेपार या गावात, नंतर खांडेपार येथून डिचोली तालुक्‍याच्या नार्वे या पुण्यक्षेत्रात आणि नार्वे येथून परत फोंडा तालुक्‍याच्या खांडोळा गावात आले असून या स्थलांतराचा इतिहास मोठा चित्तवेधक आहे.

गोमंतकात परशुरामकालीन गौडसारस्वत ब्राम्हण लोकांनी जी आपापल्या कुलदैवकाची स्थापना केली, त्यापैकीच हे एक देवस्थान. गोवा बेट किंवा तिसवाडी पोर्तुगीज फिरंगी लोकांनी अदिलखानाकडून इ. स. १५१० साली जिंकून घेतल्यानंतर या गोवा बेटात जी हिंदूची पुष्कळ देवालये होती, त्या देवालयांवर पोर्तुगीजांच्या अमदानीत संक्रांत आली. त्या देवालयात दिवाडी बेटावरील २१ देवतांची नावे असून त्यात श्रीगणेश दैवत आहे. सध्या या ठिकाणी पुन्हा गणेशाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे.
सरकारी माहितीवरून निश्‍चितपणे सांगता येते, की दिवाडी येथे त्याकाळी असलेले श्रीगणपतीचे दैवत इ. स १५४० सालापूर्वी किंवा त्या सालात तरी नावेलीहून बाहेर स्थलांतर झालेले आहे आणि त्याकाळच्या आदिलशाहीत फोंडे महालातील खांडेपार या गावी त्या दैवताच्या भक्तगण  कुळावी महाजनानी स्थापना केलेली आहे. पुढे काही कालानंतर त्या श्रीगणपती दैवताचे जे कुळावी महाजन नावेलकर तिसवाडी तालुक्‍यातील ताळगाव गावात वास्तव्यास आले, तेव्हा पुन्हा स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली. नावेलकरांची काही मंडळी खांडेपार गावात गेली आणि तेथे एका रात्री कोणास चाहूल न लागू देता अचानक देवालयातील श्रीगणपती देवाची मूर्ती हलवून ती आपल्या बरोबर घेऊन ती ताळगावी येण्याच्या इराद्याने वाटचाल करू लागली. ही रात्र धनत्रयोदशीची होती. मूर्ती घेऊन वाटचाल करीत करीत दिवस उजाडेपर्यंत त्यांना बाणास्तरी खाडी गाठली, तो दिवस नरकचतुर्दशीचा. खांडेपार गावात देवालयात सकाळीचे देवदर्शन घेण्यात गेलेल्यांना तेथे गर्भागारात स्थानावर मूर्ती दिसली नाही. 

मूर्तीचा शोध घेण्यास सुरवात झाली व काही मंडळींना मूर्ती घेऊन जाणारी मंडळी भेटली. तेथे त्यांच्यात बाचाबाची झाली व शेवटी दोन्ही मंडळींमध्ये समंजसपणे तडजोड होऊन असे ठरले की दोघांसही सोईस्कर व समांतर अंतरावर दैवताची भेट घेता येईल अशा ठिकाणी दैवत स्थापन करावे. ठरावाप्रमाणे दैवत नार्वे येथे प्रतिष्ठापित करण्यात आले. पुढे काही काळानंतर अंदाजे इ. स. १७४९ सालाच्या आसपास हे श्रीगणपती दैवत नार्वेहून स्थलांतर करून फोंडा महालाच्या खांडोळा गावात आणून तेथे एका डोंगराच्या कुशीत सुरक्षित जागी देवालय बांधून या दैवताची स्थापना करण्यात आली. तेव्हा पासून आजपर्यंत सदर देवालय खांडोळा या गावात आहे. 
देवालयाच्या भागास श्रीगणपतीवाडा म्हणतात व वरील भागात वसलेल्या वस्तीत गणेशनगर, गणपतीवाडा असे नाव देण्यात आले. 

खांडोळा गावातील या देवालयात प्रमुख दैवत गणपती आणि इतर देवालाये आहेत. म्हणजे श्रीशांतादुर्गा उजवीकडे वेगळ्या देवालयात, श्रीग्रामपुरुष, श्रीपूर्वाचारी, श्रीगणपतीच्या गर्भागरात, श्रीरवळनाथ, श्रीमहालक्ष्मी, श्रीलक्ष्मीनारायण, श्रीसूर्यनारायण वेगवेगळ्या गर्भागरात पण श्रीगणपती देवालयात. श्रीगणपतीची मूळ प्राचीन पाषाण मूर्ती जी गर्भागरात अधिष्ठित होती. त्या मूर्तीच किंचित भग्नावस्थेचा संशय तिच्या प्राचीनत्वामुळे दिसल्यामुळे, त्या देवस्थानच्या सर्व कुळावी महाजनानी एकत्र येऊन मूळ मूर्ती स्थानावेगळी करून च्या जागी नवी आकर्षक सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती विधिपूर्वक प्रतिष्ठापना मोठ्या अवर्णनीय उत्सव समारंभाच्या सोहळ्यात कैवल्यपूर मठाधिपती श्रीमत्‌ सच्चिदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शुक्रवार ३१ जानेवारी १९६९ रोजी १ वाजून १५ मिनिटावर करण्यात आली असून जुनी मूर्ती गर्भागरांत उजवीकडे दुसऱ्या आसनावर सुरक्षित ठेवण्यात आली आहे. 

विविध उत्सव या देवालयात प्रत्येक महिन्यात चतुर्थीस प्रत्येक महिन्यात चतुर्थीस श्रीगणपती देवाचा शिबिकोत्सव  साजरा केला जातो. श्रीरामनवमी, श्रीअनंतव्रत, दसरा, तुलसी विवाह, गौळणकाला असे उत्सव साजरे होतात. 
 

संबंधित बातम्या