वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिरे: फर्मागुढीतील गोपाळ गणपती... भाविकांचे आराध्य दैवत

प्रतिनिधी
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

फोंडा तालुक्‍यात तसे पाहिले, तर अनेक गणपतीची मंदिरे आहेत. त्यातल्या त्यात फर्मागुढी येथील छोटेखानी सुबक सुंदर गोपाळ गणपतीचे मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. 

फोंडा:  गणराया म्हणजे राज्यातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान. राज्यात प्रत्येक ठिकाणी गणेश मंदिरे आहेत. या गणेश मंदिरांत कायम उत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उत्सवातून केवळ श्रद्धा आणि अध्यात्माची देवाणघेवाण होते असे नाही, तर गणरायाच्या भक्तीतून सादर होणाऱ्या कार्यक्रमात एकजुटीचे प्रदर्शनही होते. 

फोंडा तालुक्‍यात तसे पाहिले, तर अनेक गणपतीची मंदिरे आहेत. त्यातल्या त्यात फर्मागुढी येथील छोटेखानी सुबक सुंदर गोपाळ गणपतीचे मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. 

गोपाळ गणपतीचे मंदिर उभारण्यामागे एका गुराख्याचा संदर्भ येतो. त्यामुळेच गणपतीच्या आधी गोपाळ म्हणजे गुरांचे पालन करणारा तो गोपाळ असे नामाभिदान प्राप्त झाले आहे. फर्मागुढीच्या या विस्तीर्ण पठारावर गुरांना चरण्यासाठी गेलेल्या गुराख्याला पहिल्यांदा श्रीची मूर्ती आढळली आणि तेथेच एक छोटेखानी मंदिर उभारण्यात आले. आज हा पठार विकसीत झाला आहे. शैक्षणिक संस्था उभारण्यात आल्या आहेत. एका बाजूला शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा, तर समोर गोपाळ गणपतीचे देखणे मंदिर. विशेष म्हणजे देशी तसेच विदेशी पर्यटक हे सुबक सुंदर गोपाळ गणपतीचे मंदिर पाहण्यासाठी आणि श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठी उपस्थिती लावतात. 

सध्या कोरोनाची महामारी असल्यामुळे पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण आले आहे. त्यातच मंदिर समितीनेही खबरदारीचे उपाय म्हणून काही निर्बंधही लावले आहेत. भाविकांच्या हितासाठीच हे निर्णय घेतले आहेत. राज्याच्या दिवंगत मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी व नंतर आलेल्या समितीचे अध्यक्ष व सदस्यांनीही मंदिर व परिसराच्या उत्कर्षासाठी उचित असे निर्णय घेतले. मंदिराच्या मागे असलेल्या इमारतीत प्रशस्त अशी सभागृहे आहेत, त्यांचा वापर लग्न तसेच इतर मंगल कार्यासाठी सातत्याने होतो.

फर्मागुढीच्या या गोपाळ गणपतीच्या मंदिरात दरवर्षी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अमाप उत्साहात साजरा होतो. यादिवशी दिवसभर कार्यक्रम तसेच रात्री भजन तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होतात. याशिवाय संकष्टी तसेच विनायकी चतुर्थीला तर भाविकांची श्रीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागतात. उत्सवादिवशी भाविकांना देवस्थानतर्फे महाप्रसाद उपलब्ध केला जातो. त्यात समाजातील सर्व थरातील भाविक भक्त मंडळी उपस्थिती लावून श्रीचा आशीर्वाद घेतात. मंदिराचे प्रशासन उत्तमप्रकारे चालल्याने भाविकांची उपस्थितीही वाढतच असते.

मंदिराच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण अशा जागेत कार्यक्रम करण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. विशेष म्हणजे फोंडा पत्रकार संघाचे दरवर्षी संगीत संमेलन याच ठिकाणी गोपाळ गणपतीच्या आशीर्वादाने उत्साहात साजरे केले जाते. भाविक मनोभावे गोपाळ गणपतीची आराधना करतात आणि इच्छित फलप्राप्ती झाल्याबरोबर श्रीचे दर्शन घेऊन आपले नवसही फेडतात. अशी ही गोपाळ गणपतीची कृपा भाविकांवर सदैव असल्याने मंदिरात गणेश भक्तांची होणारी गर्दी ही या दैवताच्या साक्षात्काराचीच प्रचीती असल्याचे मानले जाते. 

देवदर्शन अन्‌ पर्यटनही..!
अंत्रुज महालातील फर्मागुढी परिसर हा तसा रमणीय. फर्मागुढीच्या या पठारावर प्रत्यक्ष गोपाळ गणपतीचे वास्तव्य. त्याच्या जोडीला स्वराज्याचा ज्यांनी संदेश दिला त्या शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा आणि जोडीला विविध शैक्षणिक संस्थांचे प्रकल्प. फर्मागुढीचा हा परिसर राष्ट्रीय महामार्गावर वसला आहे. त्यामुळे कायम या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू असते. गोपाळ गणपतीवर गोमंतकीयांची श्रद्धा आहेच. मात्र, देशी व विदेशी पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात आणि श्रींचे दर्शन घेतात. मंदिरासमोर असलेल्या शिवाजी महाराजांचा किल्ला आणि पुतळ्यालाही भेट देऊन हे लोक पर्यटनाचा आनंद लुटतात. एकापरीने या पर्यटकांसाठी फर्मागुढी परिसर म्हणजे देवदर्शन आणि पर्यटनही आहे.

संबंधित बातम्या