केंद्रीय कृषी विधेयकाला शेतकऱ्यांचा विरोध

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मते जाणून न घेता जी कृषी विधेयके संमत केली आहेत, ती विधायके आम्हाला नकोत.

पणजी: केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मते जाणून न घेता जी कृषी विधेयके संमत केली आहेत, ती विधायके आम्हाला नकोत. राज्य सरकारला जर राज्यातील शेतकऱ्यांची आणि त्यांच्या भविष्याची खऱ्या अर्थांने काळजी असेल तर भाजपच्या नेत्यांनी दिल्लीला जाऊन या विधेयकांना विरोध दर्शवावा आणि ही विधेयके नामंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर केली. 

यावेळी संतोष मांद्रेकर, संजय बर्डे, आणि केरकर, जॉन लोबो, सेसिल रॉड्रिग्स आणि इतर अनेक शेतकरी तसेच समाजसेवक उपस्थित होते. यावेळी विधेयके जाळून शेतकऱ्यांनी आपला विरोध नोंदविला.
 
राज्यातील शेतकऱ्यासांठी हे विधायक लागू करण्यापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांची मते जाणून घेणे महत्त्‍वाचे आहे. राज्यतील शेती अधिकाधिक प्रमाणात कशा पद्धतीने कंत्राटदारांच्या घशात जाईल, यासाठी सरकार कार्यरत असल्याचे यावेळी बोलताना सेसिल म्हणाल्या. 

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी शेतकऱ्यांना या विधेयकाबाबत भेटायला हवे आणि त्यांची मते जाणून घ्यायला हवीत. शेतकरी वर्ग हा गरीब असून या सरकारने गरिबांवर अन्याय करण्याचा जणू मक्ताच उचलला आहे. आम्हाही इतरांप्रमाणेच विकासाच्या शोधात आहोत आणि म्हणून आम्हाला जबरदस्तीने आमच्यावर थोपलेली कोणतीही गोष्ट नको, असल्याचे अनिल केरकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या