ताळगाव परिसरातील शेतकरी चिंतेत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

ताळगाव परिसरात उरली-सुरली शेती काही कुटुंब लागवडीखाली अजूनही आणत आहे. अनेक ठिकाणी शेती पडीक राहिली आहे. सध्या लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात काढणीस आलेल्या भातपिकावर ढगाळ हवामान आणि पावसाचा होणाऱ्या शिडकाव्यामुळे परिणाम होण्याची भीती येथील शेतकऱ्यांना वाटू लागली 
आहे. 

 पणजी: ताळगाव परिसरात उरली-सुरली शेती काही कुटुंब लागवडीखाली अजूनही आणत आहे. अनेक ठिकाणी शेती पडीक राहिली आहे. सध्या लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात काढणीस आलेल्या भातपिकावर ढगाळ हवामान आणि पावसाचा होणाऱ्या शिडकाव्यामुळे परिणाम होण्याची भीती येथील शेतकऱ्यांना वाटू लागली 
आहे. 

ताळगावमध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेवली आहे. काही शेतात सांडपाणी असल्याने ती लागवडी खाली येत नाही, अशी स्थिती आहे. पण ज्या ठिकाणी शेती केली जात आहे, ते क्षेत्र फारच कमी आहे. या शेतात सध्या असणारे भात पीक मागील काही दिवसांपासून पडलेल्या उनामुळे काढण्याच्या तयारीत शेतकरी होते. परंतु हवामान बदलामुळे ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे काढणीस आलेल्या भात पिकाच्या लोंबीवर त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

करंजाळे परिसरात शेती करणाऱ्या गावस या शेतकऱ्याने सांगितले की, नागाळीच्या बाजूला आमची काही शेती आहे, पण त्याठिकाणचे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे पावसाळ्यात तेथे पीक घेता येत नाही. जे काही पीक घेता येते, ते रोझरी स्कूलच्या बाजूला असलेल्या शेतात घेता येते. त्याठिकाणी लागवड केलेल्या भात पिकावर सध्याच्या हवामानाचा परिणाम होण्याची भीती आहे. ताळगाव परिसराला लागून असलेल्या सांताक्रूझ परिसरात मागील काही दिवसांत ज्या शेतकऱ्यांनी भात पीक काढले आहे, ते भात पीक सुकविण्याच्या गडबडीत शेतकरी दिसत होता. परंतु दोन दिवसांपासून हवामान बदलामुळे शेतकरी चिंतेत आहे.

 जे भात पीक काढले आहे, त्यास ऊन मिळणे आवश्‍यक आहे. परंतु जर काही दिवस असेच वातावरण राहिले तर साळीतील भात पूर्णपणे न सुकल्याने त्यावरही विपरित परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
 

संबंधित बातम्या