गोव्याचा अट्टल गुन्हेगार अन्वर शेखवर जीवघेणा हल्ला; पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे अनर्थ टळला !

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

अट्टल गुन्हेगार अन्वर शेख (टायगर) याच्यावर मंगळवारी दुपारी आर्ले सर्कलजवळ पिस्तुलातून गोळी झाडून  व कोयत्याने वार प्राणघातक हल्ला करण्यात आला.

सासष्टी  : अट्टल गुन्हेगार अन्वर शेख (टायगर) याच्यावर मंगळवारी दुपारी आर्ले सर्कलजवळ पिस्तुलातून गोळी झाडून  व कोयत्याने वार प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी अन्वर याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून या प्रकरणी रिकी होर्णेकर (कुडचडे) याला घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य चौघांचा शोध पोलिस घेत आहेत. पिस्तुलातून झाडलेली गोळी अन्वरच्या मांडीत घुसली आहे. हल्ला करणाऱ्यांनी कोयत्यानेही केले. या प्रकरणात रिकी याच्यासोबत तंबी नाईक, सलीम हे संशयित व अन्य दोघे सहभागी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

‘एक इंचभरही जमीन देणार नाही’;कासावली भूमिपुत्रांचा रेल्‍वे दुपदरीकरणाला विरोध

पाच जणांकडून सशस्‍त्र हल्ला

गजबजलेल्या आर्ले सर्कलजवळ दुपारी एकच्या वाजण्‍याच्‍या दरम्यान ही घटना घडली. अन्वर याची दुचाकी गाडी आर्ले - फातोर्डा परिसरात  दुपारी एक वाजण्‍याच्या आसपास बंद पडल्याने ती ढकलून मॅकेनिककडे नेत होता. ही माहिती रिकी होर्णेकर व त्याच्या चार साथीदारांना कळाल्यावर ते पाचहीजण पिस्तुल, रॉड, कोयता तसेच तलवारी घेऊन आर्ले परिसरात पोहोचले. संशयिताना अन्वर दिसल्यावर एकाने अन्वरवर पिस्तुलने गोळी झडली. ही गोळी अन्वरच्या मांडीला लागली. गोळी बसल्यावर अन्वर जखमी अवस्थेत तेथून धावत सुटला. पण, रिकी व त्याच्या साथीदारांनी  तलवार तसेच कोयता घेऊन पाठलाग केला. या रस्त्यावरून पोलिस अधीक्षक सॅमी तावरीस जात होते. त्यांना हे दृश्य दिसल्यावर त्यांनी त्वरित फातोर्डा पोलिसांनी सूचित केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रिकी याला अटक केली. पण, त्याचे साथीदार तेथून फरार झाले.  

फातोर्डा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी एकच्या आसपास आर्ले फातोर्डा परिसरात भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून संशयित रिकी होर्णेकर याला ताब्यात घेतले. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या अन्वर शेखला मडगाव हॉस्पिसीओ इस्पितळात दाखल केले नंतर त्याला गोमेकॉत उपचारासाठी नेण्यात आले. रिकी याच्यासोबत आलेले तंबी नाईक, सलीम व अन्य दोन संशयित घटनास्थळावरून पळून गेले.

गोव्यात कालपासून घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागला

कोयता जप्‍त

हा प्राणघातक हल्ला करण्यासाठी वापरलेला कोयता फातोर्डा पोलिसांनी जप्त केला असून इस्पितळात उपचार घेणाऱ्या अन्वर शेख याची जबानी नोंद करून घेतल्यावर रिकी व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हे पाचही संशयित कुडचडे येथे राहत असून संशयित व अन्वर शेख यांच्यात पूर्ववैमनस्यातून हे भांडण झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यात समावेश असलेले चार फरार संशयितांना लवकरच अटक करण्यात येणार आहे, असे नायक यांनी सांगितले. 

फातोर्डा परिसरात खळबळ

अट्टल गुन्हेगार अन्वर शेख याच्यावर हल्ला झाला त्यावेळी आर्ले फातोर्डा परिसरात लोकांची खळबळ उडाली. पोलिसांनी येऊन या हल्ल्यावर रोख लावल्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या अन्वरला पाहण्यासाठी आर्ले परिसरात मोठी गर्दी निर्माण झाली होती. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या अन्वर शेख याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होत आहे.

संबंधित बातम्या