एफसी गोवाचा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार कामगिरी उंचावलेल्या केरळा ब्लास्टर्सविरुद्ध पूर्ण तीन गुणांचे लक्ष्य

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

 सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत लढण्याचा निर्धार राखत एफसी गोवाने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध पूर्ण तीन गुणांचे लक्ष्य बाळगले आहे.

पणजी: सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत लढण्याचा निर्धार राखत एफसी गोवाने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध पूर्ण तीन गुणांचे लक्ष्य बाळगले आहे. त्यांच्यातील सामना शनिवारी  बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल.

‘‘सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत लढण्याचा निर्धार आहे. स्पर्धेतील प्रत्येक संघाचा दर्जा उच्च आहे. त्यामुळे पूर्ण तीन गुणांसाठी झुंजावेच लागेल. प्रत्येक सामन्यात विजय हे ध्येय बाळगून पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट्य आहे,’’ असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. स्पर्धेत सर्वाधिक नऊ गोल केलेला स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलो शंभर टक्के तंदुरुस्त असल्यास उद्या सुरवातीपासून खेळेल, असेही फेरांडो यांनी नमूद केले. मागील दोन सामन्यात स्पेनच्याच जोर्जे ओर्तिझ याने आंगुलोच्या अनुपस्थितीत एफसी गोवाच्या आक्रमणाची बाजू सांभाळली. ‘‘अगोदरच्या काही सामन्यात केरळा ब्लास्टर्सने खेळ उंचावला आहे, आमच्यासाठी उद्याची लढत कठीणच असेल,’’ असे एफसी गोवाच्या प्रशिक्षकाने नमूद केले.

 

अपराजित कामगिरी

एफसी गोवाने सध्या 12 लढतीत पाच विजय, चार बरोबरी, तीन पराभव अशी कामगिरी नोंदवत  19 गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे. मागील पाच सामने अपराजित राहताना त्यांनी सामन्याच्या अंतिम टप्प्यात निर्णायक गोल केलेले आहेत. पाच लढतीतून 11 गुणांची कमाई करत त्यांनी गुणतक्त्यातील स्थान उंचावले. दुसरीकडे किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सने मागील तीन सामन्यात कामगिरी उंचावली असून त्यांनी आक्रमतेस प्राधान्य दिले आहे. तीन लढती अपराजित राहताना दोन विजय व एका बरोबरीसह सात गुण प्राप्त केले आहेत. एकंदरीत 12 लढतीत तीन विजय, चार बरोबरी व पाच पराभव अशी कामगिरी नोंदविताना त्यांनी 13 गुणांची कमाई केली असून ते नवव्या क्रमांकावर आहेत.

 

बचाव महत्त्वाचा

केरळा ब्लास्टर्सने स्पर्धेत सर्वाधिक 21 गोल स्वीकारले आहेत, त्याचा बचाव कोलमडताना दिसतो. त्यामुळे एफसी गोवाच्या धारदार आक्रमक शैलीसमोर केरळा ब्लास्टर्ससाठी बचाव महत्त्वाचा असेल. एफसी गोवाने मागील लढतीत ईशान पंडिता याने शेवटची पाच मिनिटे असताना गेलेल्या गोलमुळे एटीके मोहन बागानला बरोबरीत नोंदविले होते, तर केरळा ब्लास्टर्सने राहुल केपी याच्या इंज्युरी टाईम गोलमुळे बंगळूर एफसीला 2-1 फरकाने नमविले होते. ‘‘ईशानसारखे युवा खेळाडू महत्त्वाचे आहेत, त्यांना संरक्षण देत त्यांच्यावर आम्ही मेहनत घेत आहोत. त्यांना खूप प्रगतीची संधी आहे. फुटबॉल फक्त गोल नोंदविण्यापुरते मर्यादित नसते,’’ असे फेरांडो एफसी गोवा संघातील युवा खेळाडूंविषयी म्हणाले.

 

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे एफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सवर 3-1 फरकाने विजय

- यंदा स्पर्धेत एफसी गोवाचे 17, तर केरळा ब्लास्टर्सचे 16 गोल

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे 9, केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्डन मरे याचे 6 गोल

- एफसी गोवाच्या आल्बर्टो नोगेरा याच्या 4 असिस्ट

- एकमेकांविरुद्ध 13 आयएसएल लढती, एफसी गोवाचे 9, केरळा ब्लास्टर्सचे 3 विजय,  1 सामना बरोबरीत

 

संबंधित बातम्या