मडगाव मासळी मार्केटमध्ये एफडीएचे कार्यालय

Dainik Gomantak
शुक्रवार, 10 जुलै 2020

फॉर्मेलिनमुळे गोमंतकीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून हा संभ्रम दूर करण्यासाठी मार्केटमध्ये येणाऱ्या मासळीची एफडीएद्वारे चाचणी करण्यात येणार आहे. एफडीएला चाचणी करण्यासाठी एसजीपीडीएने जागा पुरविली असून या जागेत एफडीए कार्यालय सुरू करणार आहे, असे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी सांगितले.

सासष्टी,

गोमंतकीयांच्या मनात फॉर्मेलिनसंबंधी कुठल्याही प्रकारचा संभ्रम राहू नये यासाठी आजपासून (शुक्रवार) सुरू करण्यात येणाऱ्या मडगावमधील घाऊक मासळी मार्केटमध्ये मासळी चाचणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी दिली.
मडगाव येथील दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरण कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली. या बैठकीत उसगाव एसजीपीडीए मार्केटचा प्रकल्प, दवर्ली येथे एसजीपीडीएचे असलेले प्लॉट, मासळीवाहू वाहने उभी करण्यासाठी असलेल्या दरात वाढ व अन्य मुद्यावर निर्णय घेण्यात आला. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक व अन्य सदस्य उपस्थित होते.
एसजीपीडीएचे दवर्ली येथे एकूण ५२ प्लॉट असून पंचायतीकडून ना हरकत दाखला न मिळाल्याने हे प्लॉट विक्री करणे शक्य नव्हते, पण पंचायतीने आता ना हरकत दाखला देण्यास तयारी दाखवली असून पंचायतीने काही अटी घातल्या आहेत. या अटी एसजीपीडीएने मान्य केल्या आहेत, असे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी सांगितले. मार्केटमध्ये येणारी मासळीवाहू वाहने उभी करण्यासाठी असलेल्या दरात वाढ करण्यात आली असून मासळीवाहू वाहनाकडून मिळणारी रक्कम यापुढे एसजीपीडीएद्वारे गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
फॉर्मेलिनमुळे गोमंतकीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून हा संभ्रम दूर करण्यासाठी मार्केटमध्ये येणाऱ्या मासळीची एफडीएद्वारे चाचणी करण्यात येणार आहे. एफडीएला चाचणी करण्यासाठी एसजीपीडीएने जागा पुरविली असून या जागेत एफडीए कार्यालय सुरू करणार आहे, असे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी सांगितले. घाऊक मासळी मार्केटमध्ये येणाऱ्या मासळीवाहू वाहनांना वेळेचे बंधन घालण्यात आले असून मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी मार्केटच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उसगावात उभारणार नवीन मार्केट प्रकल्प
उसगाव येथील एसजीपीडीएच्या मार्केटला गळती लागल्याने विक्रेत्यांना तसेच ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत असून ही समस्या दूर करण्यासाठी तेथे नवीन मार्केट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मार्केटमधील विक्रेत्यांना उद्‍भवणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या मार्केटची पाहणी करण्यात आली होती व नवीन मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या