Covid 19 Delta Strain: गोमंतकीयांनो सावधान! गोव्यात पोहोचला ‘डेल्टा स्ट्रेन’

Covid 19 Delta Strain: गोमंतकीयांनो सावधान! गोव्यात पोहोचला ‘डेल्टा स्ट्रेन’
covid 19 delta.jpg

पणजी: शेजारील महाराष्ट्रात (Maharashtra) ‘डेल्टा स्ट्रेन’ (Delta stain) असे नामकरण झालेल्या कोविडच्या (Covid-19) नव्या उत्प्रेरकाचे रुग्ण आढळून आले आहेत. गोव्यातही या स्ट्रेनचा संसर्ग होत असल्याची भीती आहे. आरोग्य खात्याकडून आतापर्यंत डेल्टा स्ट्रेन रुग्णाची नोंद झाली नसली तरीही गोव्यात (Goa) या स्ट्रेनचे रुग्ण असल्याची खात्रीलायक माहिती ‘गोमन्तक’कडे आहे. (Fear of covid 19's new delta strain reaching Goa)

सरकार या प्रकरणी माहिती का लपवतेय, असा संशय निर्माण होतोय. कारण गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी गोव्यातील कोरोना रुग्णात डेल्टा हा धोकादायक स्ट्रेन्स आढळल्याचे मान्य केले आहे. गोव्यातील डेल्टा प्लस हा अती धोकादायक स्ट्रेन्स नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गोव्यातील प्रसिद्ध डॉ. ऑस्कर रिबेलो म्हणाले की, डेल्टा हा धोकादायक स्ट्रेन आहे. पण तो बरा होऊ शकतो. माझ्या माहितीनुसार, गोव्यात डेल्टा स्ट्रेन आढळून आलेला आहे. परंतु ‘डेल्टा प्लस’ हा आढळलेला नाही. डेल्टा हासुद्धा अत्यंत धोकादायक स्ट्रेन असून, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या आरोग्याला अधिक धोका असतो. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

राज्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य खाते, समुद्र विज्ञान संस्था, गोवा विद्यपीठ व आयसीआरए (जुने गोवे) अशा पाच मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा आहेत. मात्र आरोग्य खात्याच्या लॅबमध्ये डेल्टा स्ट्रेनची तपासणी केली गेली. डेल्टा प्लसची तपासणी ही एसआरएल डायग्नोस्टिक लॅबमध्ये करण्यात आली, अशीही माहिती आहे. याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी यावर बोलणे टाळले. जे काय घडते, आढळते, त्याची माहिती लोकांना दिल्यास सर्वांच्या दृष्टीनेच योग्य होईल, असे सांगत त्यांनी काही संकेत दिले आहेत. डेल्टा व डेल्टा प्लस हे धोकादायक स्ट्रेन्स गोव्यात आढळूनही आरोग्य खात्याने त्याची वाच्यता केली नाही. यावरून आरोग्य खात्यात बऱ्याच गोष्टी दाबून ठेवल्या जात असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, गोव्यातून पुण्यात 126 नमुने पाठवले होते त्यापैकी काही नमुने हे वेगवेगळ्या स्ट्रेनचे असल्याचे आढळून आले आहे.

संसर्गाचा वेग...
 कोरोना आढळल्यापासून या विषाणूच्या स्ट्रेनमध्ये खूप बदल होत गेले. यातील ‘डेल्टा प्लस’ हा अलीकडेचा स्ट्रेन असून, तो संक्रमित आहे. याशिवाय आतापर्यंतच्या सर्व स्ट्रेनपेक्षा तो वेगाने वाढतो. त्यामुळे लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने नागरिकांनी दोन्ही डोस घ्यावेत, शिवाय मास्क व कोरोना मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

डेल्टा स्ट्रेन संसर्ग झालेले रुग्ण गोव्यात व देशात  मोठ्या प्रमाणात बरे झाले आहेत. डेल्टा प्लस स्ट्रेनचा संसर्ग गोव्यात झाला नसल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत असले तरी तो आढळून आल्यास त्याचे घातक परिणाम येत्या काळात दिसून येऊ शकतात.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना संसर्गाची शक्यता ही 30 टक्के होते. मात्र दोन्ही डोस घेतल्यानंतर सुरक्षिततेचे प्रमाण हे 80 टक्क्यांवर येते. दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोकाही कमी होतो. कोमॉर्बिड असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यायला हवी, असे नव्या डेल्टा स्ट्रेनवरून लक्षात आल्याची माहिती ऑक्सफर्ड लॅबचे डॉ. नानासाहेब थोरात यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

1 लाख 64 हजार बाधित
गोव्यात मार्च 2020 पासून कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 1 लाख 64 हजार 957 लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 1 लाख 59 हजार 29 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच कोरोना बाधित बरे होण्याचे प्रमाण 9641 आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com