मडगाव: जनतेच्या दबावासमोर झुकून गोवा सरकारने जुने गोवे परिसर ग्रेटर पणजी पीडीएत सामील करण्याचा निर्णय सोडून दिल्याने हा एकप्रकारे ‘गोंय आणि गोंयकरांचा’ विजयच असल्याची प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. जुने गोवे परिसर वारसा विभाग म्हणून घोषित होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
जुने गोवे परिसर पीडीएच्या कार्यक्षेत्रात आणण्यासाठी गोवा सरकारने प्रयत्न केला होता. त्यावर सरदेसाई यांनी आवाज उठवून त्याविरुद्ध जनमत तयार केले. जुने गोव्याची जागतिक वारसा स्थळे राखून ठेवण्यासाठी त्यांनी युनेस्को आणि इकोमोस या संघटनांना साकडे घातले होते. तसेच केंद्रीय संस्कृती मंत्र्यांना पत्र लिहून हा परिसर ‘वारसा विभाग’ म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
जुने गोवे परिसर पीडीएत सामील करण्याचे निर्णय सोडून देण्याची सरकारची कृती हा संपूर्ण गोवेकरांचा विजय अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली. पण केवळ या यशावर समाधान मानून चालणार नाही. हे सरकार अवसानघातकी असून ते जुने गोवे परिसर कधीही बिल्डर लॉबीपुढे गहाण ठेवू शकतात त्यामुळे जोपर्यंत हा परिसर वारसा विभाग म्हणून जाहीर होत नाही तोपर्यंत हा दबाव चालूच राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ही मागणी लावून धरण्यासाठी आपला पक्ष एक दबाव गट तयार करणार असून त्यात पुरातत्व शास्त्रज्ज्ञ, स्थापत्यकला तज्ञ, अभियंते, नागरनियोजक अशांना सामावून घेण्यात येणार आहे. या गटाच्या निमंत्रक म्हणून गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्ष डॉ. रेणुका दा सिल्वा या असतील. गोव्यातील तज्ज्ञांनी आपल्या सूचना या गटाला कराव्यात असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.