दलबदलू आमदारांवर गुन्हा दाखल करा; गिरीश चोडणकर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० काँग्रेसच्या फुटिर आमदारांनी व ५५ काँग्रेस कार्यकर्त्यांनी कटकारस्थान रचून पक्षाने घेतलेल्या ठरावासाठी पक्षाच्या ‘लेटरहेड’चा व ‘सील’चा गैरवापर करून पक्ष भाजपमध्ये विलीन होत असल्याचा बनावट दस्तावेज तयार करत बनवेगिरी व फसवणूक केल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात २० एप्रिल २०२१ रोजी देऊनही गुन्हा दाखल झालेला नाही.

पणजी  : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० काँग्रेसच्या फुटिर आमदारांनी व ५५ काँग्रेस कार्यकर्त्यांनी कटकारस्थान रचून पक्षाने घेतलेल्या ठरावासाठी पक्षाच्या ‘लेटरहेड’चा व ‘सील’चा गैरवापर करून पक्ष भाजपमध्ये विलीन होत असल्याचा बनावट दस्तावेज तयार करत बनवेगिरी व फसवणूक केल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात २० एप्रिल २०२१ रोजी देऊनही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पोलिस अधीक्षकांना हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.  (File charges against defecting MLAs; Girish Chodankar) 

काँग्रेस पक्षाने १० जुलै २०१९ रोजी घेतलेल्या ठरावाचा पक्ष लेटरहेडचा गैरवापर करून चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर (केपे), फिलिप नेरी रॉड्रिग्ज (वेळ्ळी), जेनिफर मोन्सेरात (ताळगाव), इजिदोर फर्नांडिस (काणकोण), नीळकंठ हळर्णकर (थिवी), अतानासिओ मोन्सेरात (पणजी), आंतोनिओ फर्नांडिस (सांताक्रुझ), फ्रांसिस्को सिल्वेरा (सांत आंद्रे), विल्फ्रेड डिसा (नुवे), क्लाफासिओ डायस (कुंकळ्ळी) प्रसाद आमोणकर व जीतेंद्र गावकर यांनी बनावट दस्तावेज तयार केल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पक्षाची लेटरहेडस् तसेच सील हे प्रदेशाध्यक्षांच्या ताब्यात असतात त्यामुळे या सर्वांनी बनावट लेटरहेड व सील तयार करून पक्षाच्या ठरावाचा गैरवापर केला व काँग्रेस पक्ष विधानसभेच्या भाजपमध्ये विलीन झाल्याचे सभापती यांच्यासमोर काँग्रेसच्या दहा आमदारांविरुद्ध सादर केलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणीवेळी दस्तावेज सादर केला आहे. त्याच्या प्रती या तक्रारीसोबत सादर केलेल्या आहेत. 

या तक्रारीत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रदेश काँग्रेस समितीची १० जुलै २०१९ रोजी बैठक बोलावण्यात आली नव्हती तसेच बैठकही झाली नाही. समितीच्या दस्ताऐवज नोंदणी पुस्तिकेत ‘त्या’ दहा काँग्रेस आमदारांनी पक्ष विलिनीकरणाचा जो दस्तावेज सादर केला आहे त्याची कोणतीच नोंद काँग्रेस पक्षाकडे नोही. पक्षाची २९ मे २०२९ रोजी व २४ जुलै २०१९ रोजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती असे पक्ष बैठकीतील कामकाजसूचीमध्ये नोंद आहे.

संबंधित बातम्या