पर्रीकरांवरील चित्रपटाचे ऑगस्टपासून चित्रीकरण

dainik Gomantak
बुधवार, 8 जुलै 2020

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरील चित्रपटाच्या चित्रीकरणास येत्या ऑगस्टमध्ये प्रारंभ होणार असून हा चित्रपट आगामी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत मे २०२१ पर्यंत तो प्रदर्शित होईल, अशी माहिती या चित्रपटाचे पटकथा लेखक फ्लीन रेमेडिअस यांनी दिली.

म्हापसा
या चित्रपटातील एक मुख्य कलाकार पूनम कारेकर - गोवेकर यांच्या उपस्थितीत म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, की या चित्रपटाचे प्रथम कोकणी भाषेत चित्रीकरण केले जाणार आहे. त्यानंतर त्याचे मराठी व इंग्रजी भाषेत डबिंग करण्यात येईल. तसेच हिंदी व अन्य भारतीय भाषांत डबिंग करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. चित्रपटाची आंतरराष्ट्रीय आवृत्तीही काढण्यात येईल. कान्स व स्पॅनिश चित्रपट महोत्सवातही तो चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. या चित्रपटासाठी साधारणत: दीडशे कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक निर्धारित करण्यात आले आहे. पर्रीकर यांचे वैयक्‍तिक जीवन या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. तथापि, तो ‘बायोपिक’ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या चित्रपटातील पर्रीकर यांची मुख्य भूमिका मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार समीर धर्माधिकारी हे साकारणार आहेत. पर्रीकर यांचे साधारणत: वीस वर्षांपूर्वीचे जीवन या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित केले जाईल. त्यांचे आजारपण तसेच मृत्यू इत्यादी प्रसंग त्यात अंतर्भूत करण्यात आले नाहीत. भाजपचे ज्‍येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या तत्कालीन नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध त्यात दाखवण्यात येतील. या चित्रपटात विष्णू वाघ, आलेक्‍स रेजिनाल्ड, चर्चिल आलेमाव, राजन नारायण इत्यादी व्यक्‍तिरेखा आहेत. पर्रीकरांवर सुमारे वीस वर्षांपूवींच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट असल्याने त्यात ‘नरेंद्र मोदी’ ही व्यक्‍तिरेखा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाचे चित्रीकरण प्रामुख्याने गोवा, मुंबई व दिल्ली येथे होणार आहे. चित्रपटाचा कालावधी सुमारे सत्तर मिनिटे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Goa Goa Goa Goa Goa

 

संबंधित बातम्या