बाणस्तारी येथील प्रसिद्ध गणेश चतुर्थीच्या माटोळी सामानाचा बाजार आजपासून सुरू

प्रतिनिधी
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

जंगली फळे, वनस्पतींची विक्री सुरू, आज संध्याकाळपर्यंत बाजार खुला

खांडोळा: बाणस्तारी येथील प्रसिद्ध गणेश चतुर्थीच्या माटोळी सामानाचा बाजार आजपासून सुरू झाला असून, तो उद्याही  (ता. २०) खुला राहाणार आहे. यंदा कोरोनामुळे बाजार भरणार, की नाही, याबद्दल साशंकता होती. ग्रामस्थांच्या विरोधामुळे हा दोन  दिवसापूर्वी रद्दही करण्यात आला. परंतु बागायतदार व जंगली वनस्पती, वस्तू विकणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये व भाविकांना माटोळीसाठी आवश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पंचायतीने पुन्हा हा बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज बाजार भरला असून उद्याही पूर्ण दिवस हा बाजार खुला राहणार आहे.

बाणस्तारीच्या बाजारात पणजी, म्हापसा, वास्को, फोंडा, मडगाव या प्रमुख शहरांतील व्यापारी माटोळीच्या सामानाची घाऊक खरेदी करत असतात. पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणांत सुपारीचे कात्रे, नारळांच्या पेणी, केळ्यांचे घड, टरबूज, तोरणा, दुधी भोपळे तसेच जंगली माटोळीच्या फळांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. त्याशिवाय बागायती मालाचीही विक्री होत होती.

काही लोकांनी आपल्या ओज्याचे सामान खरेदी केले. यंदा बहुतेक सर्व सामानाचे दर चढेच होते. सुपारीचे कात्र्याचा दर ५०० ते ६०० रुपये; नारळाच्या पेणीचा दर ५००, ६००, ते १००० रुपये तर केळ्यांचा घड ३०० ते ५०० रुपये असा आहे, घागरी ४० ते ५० रुपये, कांगला ४० ते ५० रुपये, माट्टा ४० ते ५० रुपये दर आहे. निरफणस १००, १५०, २०० रुपये, चिबूड ५० ते १५० रुपये दर आहेत. त्याचप्रमाणे तोरण, टरबूज तसेच इतर माटोळीच्या फळांचे दरही भरमसाट वाढलेले आहेत. बाजाराचे बांधकाम सुरू असल्याने बाजार तात्पुरत्या जागेत भरविण्यात आले आहे. रस्त्यावरही बरेच विक्रेते विविध प्रकारचे साहित्य विकत आहेत. 

स्थानिक भाज्यांमध्ये दोडकी, तवशी, भेंडी व इतर भाज्यांनाही मोठी मागणी आहे. चतुर्थी सणासाठी लागणारे इतर सामानही बाजारांत तुडुंब भरलेले होते.   गणेश चतुर्थीसाठी माटोळीसाठी लागणारी फळे, फुले व गावठी भाज्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. 

संबंधित बातम्या