गोव्याच्या निसर्गसंपन्न साट्रेच्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

सत्तरी तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. चारही बाजूंनी हिरवीगार वनराई, त्याच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे व वाळपई शहर या दोन्ही गोष्टी मिळून सत्तरी तालुक्याला वेगळेपण देणारे ठरले आहे.

वाळपई : सत्तरी तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. चारही बाजूंनी हिरवीगार वनराई, त्याच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे व वाळपई शहर या दोन्ही गोष्टी मिळून सत्तरी तालुक्याला वेगळेपण देणारे ठरले आहे. विशेष म्हणजे नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील गोव्याच्या सिमेवर वसलेली गावे म्हणजे निसर्गाचे वैभवच स्पष्ट करणारी गावे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे साट्रे गाव.

सत्तरी तालुक्याच्या अगदी टोकाच्या सिमेवर साट्रे गाव वसलेला गाव. या गावाच्या परिक्षेत्रात म्हादई अभयारण्याचे खुलून दिसणारे दृष्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. साट्रे गावातून दीड दोन तास चालत गेल्यावर म्हादई वनक्षेत्राच्या पात्रात वाहणारे धबधबे सध्या युवावर्गाला भूरळ घालत आहेत. दररोज या धबधब्यावर शेकडो पर्यटक गोव्याच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. शनिवारी, रविवारी या दोन्ही दिवशी तर हजारो संख्येने लोक येतात.

विशेष म्हणजे साट्रे गावात वाहने ठेवून साट्रे गावातून पायी चालत झाडे, झुडपे तुडवत सोबत सहकारी वर्गाच्या साथीने युवा वर्ग चालत धबधब्यावर जातात. या म्हादईच्या भागात तीन चार धबधबे मिळतात. त्यात खास करून अगदी शेवटी दोन तासांच्या वाटेवर मिळणारा धबधबा म्हणजे निसर्गाचे सोनेरी सौंदर्याचे मुकटच बनलेला आहे. या धबधब्यांवर पोहचलात की, निसर्गाचे खरे रुप दिसून येऊन सौंदर्यलावण्याचा साक्षात्कार होतो. 

दररोज सकाळपासून दुपारपर्यंत देशी, विदेशी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी दिसून येते. साट्रे गावच्या अलीकडे माळोली नानोडा बांबर गावच्या तिस्कावर वनखात्याचा तपासणी नाका मिळतो. त्याठिकाणी धबधब्यावर जात असलेल्या पर्यटकांची कसून चौकशी करून नोंदणी केली जाते. अधिकतम दुचाकी वाहनांचा भरणा जास्त प्रमाणात असतो. दुचाकींवर युवा-युवतींचा समावेश असतो.

 तसेच मोठ्या बसेस देखील येतात. निसर्गाची ओळख निर्माण होण्यासाठी तर काहीजण मौजमजेसाठी साट्रे गावातून पायी चालत दीड दोन तासांनी धबधब्यांवर जातात. वाटेत निसर्गाचा खरा अत्यानंद घेतात. 

वाघाची गुफाही दृष्टीस
वाटेत वाघाची पेड म्हणजेच गुंफा पहावयास मिळते. या गुहेत आधी वाघांची ये-जा होत होती. या गुहेत मोठ्या प्रमाणावर वटवाघुळांचे अस्तित्व असल्याचे तिथे जाणारे लोक सांगतात. या भागात मिळणारा एक धबधबा अगदी उंच असून तो खाली राहून वर नजर घातल्यास डोळ्यांच्या नजरा कमीच पडतात, असा देखणा धबधबा आहे. या म्हादईच्या परिसरात निसर्गामुळे, वनवेलींमुळे दगड धोंड्यांमुळे वेगळ्याच रंगांची छटा पाण्यातून उमटून येते. पाणी अगदी हिरव्या रंगांनी बहरलेले असते. एकूणच साट्रे गावच्या परिसरातील म्हादई अभयारण्यातील धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना निसर्ग आणखीनच खुलून दिसतो. 

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी बनेल आकर्षण.
साट्रे गावात हल्लीच प्रसिद्धीला आलेली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी पिकाची लागवड भविष्यात पर्यटकांना आकर्षण ठरणारी होऊ शकते. स्ट्रॉबेरी व म्हादईतील धबधबे हे गणित अगदी जुळून येणारे आहे. पावसाळ्यात वाहणारे धबधबे सत्तरी तालुक्यात असंख्य आहेत. पण, हिवाळ्यात व पुढेही सतत वाहणारा साट्रेचा धबधबा निसर्गाची हुबेहूब प्रतिकृती दिसते. त्यामुळे आता सरकारने गांभीर्याने घेऊन साट्रे गावात पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

पर्यटनदृष्ट्या विचार व्हावा
पर्यटकांची संख्या अशीच दिवसेंदिवस वाढत गेली तर साट्रे गावात पर्यटनदृष्ट्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या ठिकाणी छोट्या-मोठ्या हॉटेलांनाही चांगले दिवस येऊ शकतात. त्यातून रोजगार उपलब्धीही होण्याची शक्यता असल्याने सरकारने त्यादृष्टीने विचार करायला 
हवा. 

-पद्माकर केळकर

संबंधित बातम्या