
Fire In Goa राज्यभरात तब्बल 18 ठिकाणी अग्नितांडव सुरू असल्याचे आज सकाळी स्पष्ट झाले. वनमंत्री विश्वजीत राणे आणि नौदल पश्चिम विभाग प्रमुखांनी केलेल्या हवाई पाहणीत ही गोष्ट स्पष्ट झाली.
त्याबरोबरच गेल्या शनिवारी म्हादई खोऱ्यात लागलेली आग अजूनही धुमसतच आहे. तेथे आज 9 ठिकाणी आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. ही आग विझविण्यासाठी नौदलाबरोबर हवाई दल आणि कर्नाटकाची मदत घेण्यात येणार आहे.
राज्यात सुरू असलेल्या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर म्हादई अभयारण्यात जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय अभयारण्याअंतर्गत भागातील काजू बागायतींमध्येही आग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी वनसंरक्षक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अभयारण्यातील पहारा वाढविण्यात आला आहे.
कुठ्ठाळी नावता येथे डोंगराळ भागात आग लागल्याची घटना काल रात्री घडली असून अग्निशमन दल तसेच नौदलाकडून आग विझविण्यास अथक परिश्रम सुरू आहेत. डोंगराळ भाग असल्याने अग्निशमन दलाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
दाट झाडी असल्यामुळे अग्निशमनचे वाहन घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्यामुळे बुधवारी सकाळपासून नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाणी फवारले जात आहे. बुधवारी दुपारी अग्निशमन दलाच्या मदतीसाठी एका व्यवस्थापनाने आपले 50 कामगार दिले.
म्हापशा, पर्रा- आसगाव दरम्यानच्या जंगलात भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी आठच्या सुमारास लागल्याची माहिती मिळाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 3 टँकर घटनास्थळी दाखल झाले असले तरी अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाही अशी माहिती समोर येतेय.
तर कुळे येथे आज दुपारी अचानक माळरानावर आगीने रौद्र रूप धारण केले. आग आटोक्यात येत नाही, याची खात्री झाल्याने कुडचडे येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांनी पाण्याच्या फवाऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवले..
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.