फटाक्यांचे १०.२ लाखांचे सामान जप्त 

विलास महाडिक
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

गणेशचतुर्थी काळात मोठ्या प्रमाणात गोव्यात सामान येत असल्याने त्याची तपासणी करण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पणजी

वजनमापे खात्याच्या मडगाव विभागाच्या पथकाने आज रावणफोंड - मडगाव येथील भागात फटाके सामान वितरित करत असलेल्या ट्रकाची झडती घेतली. सुमारे ६०६० फटाक्यांच्या सामानाच्या पॅकेजिसवरील माहिती कायद्यानुसार नसल्याने हे सामान जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे १० लाख २० हजार रुपये असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
गणेशचतुर्थी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी होत असल्याने शिवकाशी येथून हे सामान घेऊन ट्रक मडगाव येथे आला होता. सुमारे आठ ते दहा दुकानधारकांनी हे सामान मागविले होते. या सामानाची तपासणी करण्यात आली असता त्यातील अनेक फटाक्याच्या पॅकेजिसवर उप्तादन केल्याची तारीख नाही तसेच ती किती काळ टिकू शकतात याचीही माहिती नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. गणेशचतुर्थी काळात मोठ्या प्रमाणात गोव्यात सामान येत असल्याने त्याची तपासणी करण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई सहाय्यक नियंत्रक पांडुरंग पुरुषन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देमू मापारी, सुधीर गावकर व मेल्विनो फुर्तादो या पथकाने केली.

 

 

संबंधित बातम्या