पसार कैद्याने दिल्याच होत्या पोलीसांच्या हातावर तूरी.....पण....!

पसार कैद्याने दिल्याच होत्या पोलीसांच्या हातावर तूरी.....पण....!
Firing on police in Mhapusa

म्हापसा : म्हापसा येथील सरकारी जिल्हा इस्पितळ आवारातून काल रात्री साथीदारांच्या साहाय्याने पळण्यात यशस्वी ठरलेला कोलवाळ येथील तुरुंगातील कच्चा कैदी विवेककुमार प्रमोदकुमार गौतम ऊर्फ आर्यन (वय २८ रा. चंद्रनगर, आग्रा) याला पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने पणजी बसस्थानक परिसरात पकडले. तो राज्याबाहेर पळण्याच्या तयारीत असताना ही कारवाई केली. त्याला काल रात्री ११ वाजण्‍याच्‍या सुमारास पोलिसांच्या ताब्यातून अन्य दोघांनी पळवले होते. याप्रकरणात सहभागी असलेला आर्यनचा भाऊ मोहितकुमार गौतम ऊर्फ अंकित यालाही पोलिसांनी गोवा पुणे खासगी बसमधून प्रवास करताना पत्रादेवी येथे पकडले. अद्याप तिसरा संशयित बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आवळल्‍या मुसक्‍या
काल रात्री म्हापशाच्या सरकारी जिल्हा इस्पितळात या कैद्याला पळवताना गोळीबार करण्यात आला होता. संशयितांच्या या धाडसामुळे पोलिस संशयितांना पकडणार का? याविषयीची चर्चा आज दिवसभर सुरू होती. राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांचा एक व्हॉटसॲप समूह आहे. एखादी घटना घडल्यावर त्यावर त्याची खबर लगेच दिली जाते. काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर त्याबाबत माहिती या समुहावर देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरातील पोलिस पथके सक्रिय झाली होती. त्यातच गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना आर्यन हा पणजी बसस्थानक परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. तो राज्याबाहेर पळून जाण्यासाठी बसच्या शोधात होता. त्याला बसस्थानक परिसरातच ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अन्य माहिती वदवून घेतल्यावर अंकित हा पुण्याला पसार होणार ही माहिती पोलिसांच्या हाती आली.

पूर्वनियोजित कट
आर्यनला पळवण्याचा कट हा पूर्वनियोजित होता. त्यासाठी अंकित व अन्य एकजण गोव्यात आले आणि ते मोरजी येथे एका खोली भाड्याने घेऊन राहिले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक मोरजीला गेले. तेथून तो म्‍हापसा येथे गेल्याचे समजले. त्यामुळे पोलिस म्हापशात आले तोवर तो पुण्याला जाणाऱ्या बसमधून पसार झाला होता. पत्रादेवी येथे सर्व बस तपासणे सुरू केल्यावर एका बसमध्ये अंकित सापडला. त्याला तत्काळ पकडण्यात आले. तिसरा संशयित गोव्यातच लपून राहिला असण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी शोधमोहिम तीव्र  केली असून काही ठिकाणी नाकाबंदी केली आहे. 

अनेक गुन्ह्यात सहभाग
पर्वरी पोलिस स्थानकात अपहरण प्रकरणात गुन्हा नोंद आहे. तसेच हणजुणे पोलिस स्थानकात लोकांच्या घरात बेकायदेशीर घुसण्याचा गुन्हा नोंद आहे. मागच्या १४ दिवसापूर्वी झांशी पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी झांशी येथे नेले होते. त्याच काळात त्याने आपल्या साथिदारांच्या सहभागाने पलायनाचा कट रचला असावा असा संशय आहे.

मग्न असताना साधली संधी
या झटापटीच्यावेळी हवालदार राजेश सराफ जिल्हा इस्पितळात कैदी विवेककुमार गौतम याच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे तयार करण्‍यात व्‍यस्‍त होते. त्यामुळे ते घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. ज्या रुग्णवाहिकेतून कैद्याला आणले होते ती रुग्णवाहिका कैदी व पोलिसांना सोडून गेली होती. त्याचा फायदा उठवत त्याच्या दोन्ही साथिदारांनी यशस्वी पलायन केले.
असे झाले पलायननाट्य...
कोलवाळ येथील सेंट्रल जेलमधील कैदी विवेककुमार प्रमोदकुमार गौतम उर्फ आर्यन (वय २८, कळंगुट व मूळ चंद्रनगर आग्रा उत्तर प्रदेश) या कैद्याने नाट्यमयरित्या म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाच्या पार्किंग जागेतून काल रात्री पळ काढला होता. त्याच्या दोन साथिदारांनी पूर्व नियोजित कट रचून या कैद्याला पोलिसांच्या तावडीतून यशस्वीरित्या सोडवून पलायन करण्यास यश मिळवले होते.
आजारी असल्‍याचा केला बहाणा..!
मंगळवारी २९ रोजी रात्री ११ वा.च्या सुमारास कैदी विवेककुमार गौतम याने आजारी असल्याचे नाटक केले. आपल्या पोटात दुखते, तसेच उलट्या होत असल्‍याचे त्‍याने जेलगार्डना सांगितले. त्यानंतर त्याला जेलमधून रात्री ११.३० वा.च्या सुमारास म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणले होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलिस नितीन आंबेकर व हवालदार राजेश सराफ आले होते. विवेककुमार गौतम याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरानी त्याला पुन्हा जेलमध्ये पाठविले. यावेळी पोलिस नितिन आंबेकर यांनी विवेककुमार गौतम याच्या हाताला बेडी घातली होती. दोघे चालत पार्किंग जागेमध्ये रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत थांबले असता विवेककुमार गौतम याने बेडी घातलेला हात नेटाने झटकला व पलायन करण्याच्या प्रयत्न केला. त्‍याचवेळी तेथे आधीच तैनात असलेल्‍या विवेककुमार गौतम याच्‍या साथीदाराने पोलिस नितिन आंबेकर यांच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारला. तरीही नितिन यांनी आपल्या डोळ्यांची पर्वा न करता विवेककुमारच्या मागे धावले. त्यानंतर विवेककुमारचा दुसरा साथीदार गेटच्या बाहेर काळी व निळ्या रंगाची डिओ दुचाकी घेऊन तैनात होता. नितिन यांच्‍या हातातून निसटून विवेककुमार गौतम याने पलायन केले. पण, पलायनावेळी एक साथीदार नितिन यांच्‍या ताब्यात होता. दोघांमध्ये झटपट चालू झाली होती. या झटापटीवेळी विवेककुमार गौतम व त्याचा दुसरा साथीदार आपल्या दुचाकीवरून पळाले होते. काही अंतरावर पोहोचल्यानंतर विवेककुमार व त्याच्या साथीदारांच्या लक्षात आले की आपला एक साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची सुटका करण्यासाठी विवेककुमार व त्याचा साथीदार धाडसाने पुन्हा जिल्हा इस्पितळाजवळ आले.

कैदी विवेककुमार गौतम व त्याचा दुसरा साथीदार पुन्हा आपल्या साथीदाराला पोलिसांच्‍या तावडीतून सुटका करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असता पोलिस व साथिदारांमध्ये झटापट चालू असल्याचे लक्षात येतात विवेककुमारच्या बरोबर असलेल्या साथीदाराने आपल्या पिस्तुलातून गोळी झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्‍याचवेळी नितिन आंबेकर यांचा लक्ष नसताना विवेककुमार गौतम व त्याच्या दोन्ही साथिदारांनी घटनास्‍थळांहून यशस्वी पलायन केले.

सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने संशयितांचा शोध
मंगळवारी रात्री घडलेल्या प्रकाराचा शोध लावण्यासाठी घटनास्थळानजीकच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. तसेच सर्व रेल्वेस्थानके बस स्थानकांना व पोलिसाना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळावर पोलिसांना ७.६५ एमएम जिवंत काडतुसांसह भरलेली मॅगझिन सापडली, तसेच पेपर स्प्रे आणि मोडलेली हातकडी पोलिसांनी जप्त केली आहे. रात्री उशिरा या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई व म्हापसा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पाहाणी केली. पोलिसानी भा.द.सं. तेच्या ३४२/२०२०, ३०७, २२४, १२०नुसार शस्त्र वापरल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com