पहिले दाम, नंतर काम..!

Baburao Revankar
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देता येत नाही. ही परीस्थिती गेल्या दोन वर्षांपासून पालिकेवर ओढावली आहे. नेहमी वेतन वेळेवर वितरीत केले जात नाही त्यामुळे कर्मचारी वर्गात कमालीचा असंतोष आहे.

मुरगाव,  जुलै महिन्याचे हक्काचे वेतन दिले नसल्याने मुरगाव नगरपालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी संपावर गेले असून, वेतन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सर्वात श्रीमंत मुरगाव पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने जुलै महिन्याचे वेतन अद्याप वितरीत झालेले नाही.
पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देता येत नाही. ही परीस्थिती गेल्या दोन वर्षांपासून पालिकेवर ओढावली आहे. नेहमी वेतन वेळेवर वितरीत केले जात नाही त्यामुळे कर्मचारी वर्गात कमालीचा असंतोष आहे. सध्या कोविडमुळे पालिकेच्या मिळकतीवर परीणाम झालेला आहे, असे कारण दिले जात असले तरी कोणतेच मोठे विकास प्रकल्प न राबविता एवढी वर्षे कमविलेले पैसे गेले कुठे, असा सवाल कर्मचाऱ्यांतून विचारला जात आहे.
सोमवारपासून (ता. १०) बेमुदत संपावर जाण्याचा इशारा मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेने ३ ऑगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे दिला होता. तरीही पालिका मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी वेतनाची तरतूद करण्यासाठी हालचाल केली नाही. उलट निदान आठ दिवस तरी वेतन वितरीत करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालिका कर्मचारी संघटनेने दिलेल्या मुदतीत वेतन मिळाले नाही म्हणून आज (सोमवारी) संप पुकारुन काम बंद ठेवले. साफसफाई विभागातील कामगारांनी सकाळी ७ वाजल्यापासूनच संप पुकारला. त्यानंतर प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग दाखवून काम बंद ठेवले. परीणामी सोमवारी संपूर्ण दिवसांत पालिकेचे कसलेच कामकाज हाताळण्यात आले नाही. साफसफाई विभागाने कचरा उचल केली नाही. सध्या पावसाने जोर धरल्याने ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे तो पावसाच्या पाण्याने वाहून जाऊन सर्वत्र पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.परीणामी रोगराईला आमंत्रण मिळेल अशी भीती निर्माण झाली आहे.

जुलै महिन्याचे संपूर्ण वेतन मिळाल्याशिवाय कामावर रुजू न होण्याचा निर्णय पालिका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. पहिले दाम नंतर काम, असा पवित्रा घेऊन कामगारांनी घेतला आहे. सायंकाळी पालिका मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांची भेट घेऊन कामगारांनी वेतनाची मागणी केली. पण, आश्वासनापलिकडे कामगारांच्या झोळीत काहीच पडले नाही. वेतन कधीपर्यंत वितरीत केले जाईल हे लेखी स्वरूपात कळवावे, असा हट्ट कामगारांनी धरला असता श्री. बुगडे यांनी आपण लेखी काहीच देऊ शकत नाही. तसेच वेतनाचे कामकाज पाहणारा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो बरा होऊन कामावर रुजू होईपर्यंत वेतन देणे शक्य नसल्याचे सांगितले.

दोन मंत्री, आमदार असूनही
पालिका तिजोरीत खडखडाट..
.
मुरगाव पालिकेची मिळकत अन्य पालिकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. पण, कायम आणि कंत्राटी कामगारांच्या वेतनाचे सुमारे सव्वा कोटी रुपये जमविताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती बऱ्याच वर्षांपासून निर्माण होत आहे. सद्यःस्थितीत मुरगाव पालिकेवर भाजपाची सत्ता आहे. पालिकेचा कारभार ज्यांच्या हाती आहे, ते नगरविकास मंत्री मिलिंद नाईक मुरगावचे आहेत. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि आमदार कार्लुस आल्मेदा पालिका क्षेत्रांतून विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. तरीही मुरगाव पालिकेला आर्थिकदृष्ट्या शासकीय आधार मिळत नाही, याबाबत जनतेतून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

 

संबंधित बातम्या