आधी रस्ता दुरुस्ती अन्‌ आता कोरोना!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

आधी रस्ता दुरुस्ती आणि आता कोरोनामुळे मोले बाजारातील व्यवसायच ठप्प झाला आहे. रोजीरोटी चालवतानाही येथील लोकांच्या नाकी नऊ येतात.
- आपा गावकर (व्यावसायिक, मोले)

मोले-बेळगाव रस्त्याची परवड कथा, बाजार ठप्प

धारबांदोडा: आधी रस्ता दुरुस्ती आणि त्यानंतर कोरोनाची महामारी यामुळे मोले ते अनमोडमार्गे बेळगावचा रस्ता वाहतुकीसाठी शापच ठरला आहे. चौपदरी रस्ता रुंदीकरणाच्या योजनेंतर्गत मोले ते बेळगाव रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. यातील पहिला टप्पा अनमोड घाट काढल्यानंतर सुरू होतो, मात्र हा रस्ता अजून दुरुस्त झाला नसल्याने खडबडीत धोकादायक स्थितीत असलेल्या या रस्त्यावरून धोका स्विकारूनच वाहनचालक मोलेहून बेळगावला किंवा बेळगावहून मोले गाठतात. मोलेच्या तपासणी नाक्‍यावर कोरोनाच्यादृष्टीने तपासणी केली जाते, त्यासाठी दोन हजार रुपये भरावे लागतात. पूर्वी या रस्त्यावर ज्याप्रमाणे वाहनांची येजा असायची ती सध्या कमी आहे. त्यातच मोलेचा बाजारही थंडावला आहे.

बेळगाव ते मोले व पुढे पणजी महामार्ग रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. गोव्यात या राष्ट्रीय महामार्गाचे अनेक ठिकाणी रुंदीकरण झाले आहे, तर बऱ्याच ठिकाणी बगल मार्गही उभारण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या नियोजित कामाचा कर्नाटकातील बेळगावचा रस्ता दुरुस्ती व चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी गेल्या वर्षी मोले ते बेळगाव रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. अनमोड घाट वगळता कर्नाटकच्या हद्दीत या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अजून पूर्णत्वास आलेले नाही. रस्त्याचे डांबरीकरण व इतर काम पूर्ण झालेले नाही, तरीपण या रस्त्यावरून धोका स्विकारूनच वाहनचालक वाहने नेतात. मोलेहून बेळगावला जाताना वन खात्याच्या अखत्यारितील जमिनीतून गेलेल्या रस्त्याचाही वापर केला जातो. मात्र संध्याकाळी सहानंतर हा रस्ता वापरास बंदी आहे. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर येजा करण्यासाठी दुरुस्तीखाली असलेल्या मुख्य रस्त्याचा वापर वाहनचालकांकडून केला जातो. 

कोरोना तपासणी मोले चेकनाक्‍यावर!
बेळगावहून गोव्यात येणारी वाहने मोले येथे थांबवून वाहनचालक व इतरांची तपासणी थर्मल गनद्वारे करण्यात येते. मोलेतील हद्दीत शिरल्यानंतर या तपासणीसाठी दोन हजार रुपये भरावे लागतात, मात्र अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांना मात्र त्यातून मुभा आहे. या अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांच्या दर्शनी काचेवर तशाप्रकारचा स्टिकर मारला जात असल्याने या लोकांना कोरोना तपासणीतून सूट मिळाली आहे. याशिवाय एखाद्याने गोव्याच्या हद्दीत प्रवेश करताना त्याने अगोदरच कर्नाटकातील आरोग्य खात्याचा "कोरोना फ्री''चा दाखला आणल्यास त्यालाही सूट देण्यात आली आहे.

गोव्यात येण्यासाठी चोरवाटा...
कोरोनासाठी राज्य सरकारने तपासणी मोहीम नाक्‍यांवरच केली असली तरी चोरवाटांद्वारे इतर राज्यातील लोक गोव्यात घुसत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यातच एखाद्या अत्यावश्‍यक सेवेतील भाजी व इतर धान्याच्या ट्रक किंवा टेंपोमधूनही लपून काही लोक गोव्याच्या हद्दीत प्रवेश करतात, असेही मागच्या वेळेला निदर्शनास आले होते. त्यानंतर सरकारने पुन्हा कडक तपासणीचे आदेश दिले होते.

आधी रस्ता दुरुस्ती आणि आता कोरोनामुळे मोले बाजारातील व्यवसायच ठप्प झाला आहे. रोजीरोटी चालवतानाही येथील लोकांच्या नाकी नऊ येतात.
- आपा गावकर (व्यावसायिक, मोले)

मोले बाजार व लगतच्या इतर भागातील लोकांच्या व्यवसायावर पूर्णपणे परिणाम झाला आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद ठेवावा लागल्यामुळे आता पुढे काय, हा सवाल आहे.
- वामन खांडेपारकर (व्यावसायिक, मोले)

 

संबंधित बातम्या