राज्यातील पहिले वेबिनार उत्साहात; सहाशे जणांचा सहभाग

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

यावेळी सायन्स डायरेक्ट, स्कोपस आणि मेंडेले टूल्स या तीन घटकांची माहिती देण्यात आली.

पणजी,

 उच्च शिक्षण संचालनालय, पर्वरी आणि एल्सेव्हियर यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधनाशी निगडित पहिल्या वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. संशोधन विकासात आणि संशोधन लेखात एल्सेव्हियर टूल्सचा वापर कसा करावा, या अनुषंगाने आयोजित या वेबिनारमध्ये संशोधक, गोवा विद्यापीठ व राज्यातील महाविद्यालयांमधील तब्बल सहाशे प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.

यावेळी सायन्स डायरेक्ट, स्कोपस आणि मेंडेले टूल्स या तीन घटकांची माहिती देण्यात आली. तसेच एल्सेव्हियर साधनांचा वापर, संशोधनात्मक शोधनिबंध, त्याचा आराखडा, मांडणी आणि प्रकाशनाच्या संधी यावर या वेबिनारमध्ये भर देण्यात आला. या वेबिनारमधील दोन सत्रांमध्ये डॉ. शुभ्रा दत्ता ( ग्राहक सल्लागार दक्षिण आशिया एल्सेव्हियर) यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या सत्रामध्ये संशोधक व्यक्तीने सायन्स डायरेक्टमध्ये उपलब्ध उच्च गुणवत्तेचे संशोधन लेख-संदर्भ मिळविण्याची आणि पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया दर्शविली. उच्च गुणवत्तेची जर्नल्स ओळखण्यासाठी सहभागींना स्कोपसमध्ये उपलब्ध असलेली विविध वैशिष्टे आणि मेट्रिक्सची माहिती देण्यात आली. मेंडेले साधनांचा वापर शोधनिबंध आणि संशोधन लेखांच्या व्यवस्थापनासाठी कसा केला जाऊ शकतो, हे डॉ. दत्ता यांनी दाखविले.
दुसऱ्या सत्रात मासिक निवडणे, हस्तलिखित तयार करणे, संशोधन लेखाची सर्वसाधारण रचना व त्याचे नियोजन याविषयी सिंहावलोकन केले.

करोनाशी युद्ध आमचे सुरू !

करोनाच्या काळातही आम्ही हतबल झालेलो नाही. आमचा लढा निकराने सुरू असून, आम्ही यामध्ये नक्कीच विजयी होऊ, असाच आशावाद उच्च शिक्षण संचालनालयाने आयोजित केलेल्या या वेबिनारने निर्माण केलेला आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या या उपक्रमाचे राज्यातील संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक यांच्याकडून कौतुक होत आहे.

शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी यांचे संशोधन लेखन आणि प्रकाशन कौशल्य या वेबिनारमुळे सुधारणार असून, भविष्यातही उच्च शिक्षण संचालनालय संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी असे वेबिनार घेण्याची योजना आखत आहे.

- प्रसाद लोलयेकर, संचालक,

उच्च शिक्षण संचालनालय, पर्वरी.

 

संबंधित बातम्या