म्हापसा मासळी मार्केट आरोग्य परवान्याविना

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

अस्वच्छ पाण्याच्या विल्हेवाटीबाबतही पालिकेचे दुर्लक्ष

म्हापसा:  म्हापसा शहरात असलेला पालिकेचा ‘मासळी व मांस विक्री मार्केट प्रकल्प’ गेली काही वर्षे आरोग्य खात्याच्या परवान्याविना नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असून, आरोग्य खात्याकडून त्यासंदर्भात ‘ना हरकत दाखला’/ परवाना घेण्याच्या हेतूनेही पालिकेच्यावतीने काहीच केले जात नाही.

घाणपाण्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात त्या ठिकाणी ‘प्रक्रिया प्रकल्प’ उभारणार असल्याचे स्पष्टीकरण पालिकेच्या उच्चपदस्थ अभियंत्यांनी पालिका प्रशासन खात्याला तसेच आरोग्य खात्याला दिले होते. तथापि, त्याबाबतही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. घाणपाण्याच्या विल्हेवाटीसंदर्भात पालिनेने अजूनही प्रकल्प तिथे उभारला नसतानाही नियमबाह्य पद्धतीने ते मार्केट सुरूच आहे, असा दावा म्हापशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.

फेब्रुवारी २०२० मध्ये म्हापसा नागरी आरोग्य केंद्राच्या तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. साधना शेट्ये यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून मासळी मार्केटमधील स्वच्छतेसंदर्भातील आरोग्य खात्याकडून ‘ना हरकत दाखला’ अथवा ‘परवाना’ घेतला असल्यास तो सादर करण्यास कळवले होते. तथापि, ती कागदपत्रे दिलेल्या मुदतीत सादर करण्यात पालिका असमर्थ ठरली होती. त्याशिवाय, कोविडमुळे तसेच अस्वच्छतेमुळे ते मार्केट लोकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याने सध्या बंद करण्यात यावे अशा आशयाचे लेखी निवेदन २० मार्च २०२० रोजी उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व आरोग्याधिकारी यांना सादर केले होते. तथापि, त्याबाबतही शासकीय पातळीवरून कार्यवाही झाली नाही.

या गंभीर विषयासंदर्भात सातत्याने आवाज उठवणारे आरटीआय कार्यकर्ता जवाहरलाल शेट्ये म्हणाले, की हे मासळी मार्केट आता विक्रेत्यांसाठी न राहता ते मासळीचे घाऊक विक्री केंद्र झालेले आहे आणि विशेष म्हणजे त्यात नगरसेवकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. पालिकेची बाजारपेठ समितीही त्याबाबत काहीच करीत नाही. अस्वच्छ वातावरणात मार्केट सुरू ठेवणे म्हणजे लोकांच्या जिवाशी खेळ करण्यासारखा प्रकार आहे.

हा मासळी मार्केट प्रकल्प शासकीय नियमांचा भंग करून सुरू आहे, हे सुमारे सहा महिन्यांपूर्वीच अर्थांत फेब्रुवारी २०२० मध्ये म्हापसा नागरी आरोग्य केंद्राने पालिकेशी केलेल्या पत्रव्यवहारामुळे स्पष्ट झाले होते. परंतु, त्यानंतरदेखील आरोग्याधिकाऱ्यांकडून आवश्यक असलेला दाखला पालिकेने अद्याप मिळवलेला नाही. ‘कोविड-१९’ संदर्भातील जनव्यवहार थोडेफार पूर्वपदावर आल्यानंतर म्हापसा पालिका मंडळाने मासळी मार्केट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी सांडपाण्याच्या विल्हेवाटीबाबत पालिकेने काहीच केलेले नाही. तशी व्यवस्था करायची झाल्यास पालिकेच्या तिजोरीत तेवढा पैसाही नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, येथील मासळी विक्रेते संघटनेच्या अध्यक्ष शशिकला गोवेकर यांच्या मालकीचे दुकान बाजारपेठेतील चिकन सेंटरमध्ये आहे व त्यामुळे मासळी मार्केटमध्ये विक्रेत्या म्हणून अपात्र ठरतात, असा दावा केला जात आहे. या मासळी मार्केटात श्रीमंत, दुकानदार अशा वर्गांतील विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मुभा देता येत नाही, असे तेथील काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. म्हापसा पालिकेने सर्वप्रथम ‘दैनंदिन स्थानिक विक्रेता’ ही संकल्पना सर्वप्रथम स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

जे विक्रेते स्वत:हून अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या साहाय्याने पारंपरिक पद्धतीने मासे गरवून अथवा होडीतून आणतात त्यांनाच दैनंदिन मासळी विक्रेते म्हणता येईल, असा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे. खुद्द शशिकला गोवेकर घाऊक पद्धतीने मासेविक्री करीत असून, तेसुद्धा नियमबाह्य ठरते, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याबाबत पालिकेने सखोल चौकशी करावी; तसेच, या प्रकल्पात केवळ किरकोळ विक्री करणाऱ्यांनाच व्यवसाय करण्यास मुभा द्यावी अशी येथील पारंपरिक मासळी विक्रेत्यांची मागणी आहे. 

संबंधित बातम्या