फोंड्यात जागा मिळेल तेथे वाहनातून मासे विक्री

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

मत्स्यप्रेमींची चाललीय लूटमार, रस्त्यावर घाणपाणी झिरपण्याचा प्रकार, सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष

फोंडा

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर मार्केटच बंद झाले. मार्केट बंद झाल्यामुळे जागा मिळेल तेथे बसून विक्रेते माल विक्री करीत असून मासळी विक्रेत्यांवर तर कुणाचेच नियंत्रण नसल्याने मासळीचे घाण पाणी सबंध रस्त्यावरून वाहत असल्याने फोंडावासीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याप्रकरणी फोंडा पालिकेने त्वरित लक्ष घालून या मासळी विक्रेत्यांची सोशल डिस्टन्सिंगचा प्रभावी वापर करून एका ठिकाणी सोय करावी अशी जोरदार मागणी फोंडावासीयांकडून करण्यात येत आहे. केवळ फोंडाच नव्हे तर खांडेपार, तिस्क - उसगाव व इतर ठिकाणीही हीच स्थिती आहे.
फोंड्यातील बुधवारपेठमधील मासळी बाजार बंद असल्याने मासळी विक्रते मिळेल त्याठिकाणी बस्तान मांडत आहेत. मिळेल त्या वाहनातून मासे आणून ते विकले जात आहेत. रस्त्याच्या कडेला, तिठ्यावर भर बाजारपेठेच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हे मासळी विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने सगळीकडे दुर्गंधी पसरत आहे. या प्रकारावर कुणाचेच नियंत्रण नाही. वाहनातील मासळीचे घाण पाणी रस्त्यावर पाझरत असल्याने ही दुर्गंधी पसरत असल्याने रोगराईचा धोका संभवत असल्याच्या प्रतिक्रिया बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत.
मासळी हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने समुद्रात मासेमारी येत्या एक जूनपासून बंद होणार आहे. लॉकडाऊनमुळे काही दिवस मासळी विक्री करणे बंद झाली होती. त्यानंतर सरकारने काही नियम शिथिल करून मासळी विक्री व्यावसायिकांना मुभा देण्यात आली. त्यामुळे मासळी बाजारपेठेत न विक्री करता मिळेल त्याजागी वाहनांचा वापर करून विक्रते मासळीची विक्री करू लागले. विशेष म्हणजे खराब मासळी ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार होत आहे. मत्स्यप्रेमी ग्राहकांमुळे खराब मासळीही मोठ्या आवडीने ग्राहक खरेदी करून ती आपल्या कुटुंबियांना खाऊ घालत आहे, त्यामुळे रोगराई फैलावण्याचाही धोका आहे. विशेष म्हणजे फॉर्मेलीनचा वापर मासळीत होत असल्याचे मागच्या काळात स्पष्ट झाले असले तरी ग्राहक अशा प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मासळी विक्रेत्याकडून मडगाव येथून मासळी आणून ती चढ्या दराने मासळी विक्री केली जात आहे. सध्या बुधवारपेठमधील मासळी बाजार बंद ठेवण्यात आला आहे. आता तिथे फक्त चिकन व्यवसाय खुला आहे. सुक्‍या मासळीची आवक वाढली असली तरी दर चढेच आहेत. पाऊस तोंडावर असल्याने लोक सुक्‍या मासळीची बेगमी करतात, पण ही सुकी मासळीच यंदा महाग झाल्याने बेगमीवरही परिणाम झाला आहे.

तोंडाला येईल तो माशांचा दर!
फोंड्यात माशांचा दर तोंडाला येईल तो सांगितला जात आहे. बांगडे २०० रुपयांना चार, सुंगटे ४०० ते ६०० रुपये किलो, इसवण ८०० ते १००० रुपये किलो, वेर्ल्या ३०० ते ३६० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. इतर मासळीचे दरही चढेच आहेत. मत्स्यप्रेमींची एक प्रकारे लूटमार चालली आहे. एकाच ठिकाणी मासळी उपलब्ध केली जात नसल्याने मासळीचे दर अव्वाच्या सव्वा सांगितले जातात. मासळीच्या दरांवर कोणतेच नियंत्रण नाही. मध्यंतरी फोंडा पालिकेने मासळी बाजार मार्केट संकुलाच्या मागे असलेल्या एअरपोर्ट रस्त्याजवळील काझी कुटुंबियांच्या प्रशस्त जागेत हलवण्याचा निर्णय घेतला होता, पण ते अजून शक्‍य झालेले नाही.

 मासळीच्या दरावर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यातच खराब मासळी आणून विकली जात आहे. मिळेल ते वाहन रस्त्यावर ठेवून ही मासळी विकली जात आहे. या प्रकारामुळे घाण पाणी रस्त्यावर पाझरत आहे, मात्र कुणाचेच त्यावर नियंत्रण नाही - विश्‍वेश नाईक (ढवळी - फोंडा)

मासे विक्री वाहनातून केली जात असली तरी घाणपाणी रस्त्यावर झिरपते. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सगळीकडे स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असताना फोंडा पालिका क्षेत्रासह तालुक्‍यातील इतर पंचायतक्षेत्रात हाच प्रकार चालू असून कुणाचेच त्यावर लक्ष नाही - विक्रांत गावकर (तिस्क - उसगाव)

संबंधित बातम्या