मार्केट सोडून मासे विक्री रस्त्यावरच...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या अनेकांनी मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पहाटे उठून मडगावला जाऊन घाऊक दराने मासे खरेदी करायचे, आणि ते ग्राहकांना विकायचे, असा हा व्यवसाय आहे. एखादी कारगाडी किंवा व्हॅन रस्त्याच्या बाजूला लावायची किंवा रस्त्यावरच टोपल्या ठेवून ही मासेविक्री केली जात असल्याने माशांचे घाण पाणी भर रस्त्यावरून वाहत असते.

पणजी- राज्यातील मासळी मार्केटमधील मासळी आता रस्त्यावर दिसू लागली आहे. मासेविक्रीचा धंदा जागा मिळेल तेथे भर नागरी वस्तीत, रहदारीच्या रस्त्यावर किंवा एखाद्या धार्मिक स्थळाच्या बाजूलाही केला जात असल्याने या व्यवसायातील अंदाधुंदीमुळे सगळीकडे दुर्गंधी पसरण्यास कारणीभूत ठरला आहे. मासेविक्रीचा धंदा करण्यास कुणाचीही आडकाठी नाही, मात्र मासळी मार्केटमध्ये या सर्व मासेविक्रेत्यांना सामावून घेऊन एकाच ठिकाणी मासेविक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. ही समस्या केवळ फोंड्यात किंवा डिचोलीतच नाही, तर सबंध राज्यात सतावू लागली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या अनेकांनी मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पहाटे उठून मडगावला जाऊन घाऊक दराने मासे खरेदी करायचे, आणि ते ग्राहकांना विकायचे, असा हा व्यवसाय आहे. एखादी कारगाडी किंवा व्हॅन रस्त्याच्या बाजूला लावायची किंवा रस्त्यावरच टोपल्या ठेवून ही मासेविक्री केली जात असल्याने माशांचे घाण पाणी भर रस्त्यावरून वाहत असते. माशांनी भरलेल्या टोपल्या तसेच प्लास्टिक बॉक्‍स रस्त्याच्या कडेला ठेवल्या जात असल्याने त्यातील घाणपाणी रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला साचत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. मासे शिल्लक राहिल्यास हे कुजके मासे कुठेही फेकले जातात, त्यामुळेही दुर्गंधी पसरत आहे. याप्रकरणी स्थानिकांनी पंचायती किंवा पोलिसांकडे तक्रारी केल्या तरी त्याची सध्या दखल घेतली जात नसल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले.

वास्तविक चीनच्या वुहान प्रांतातून कोरोनाचे संक्रमण झाले ती जागा मांस व मासळी विक्रीची होती. घाणपाणी व टाकाऊ मांस, माशांमुळे कोरोनाचे संक्रमण झाल्याचे सांगितले जाते, आणि राज्यात तर स्वच्छता ठेवायची सोडून सगळीकडे गलिच्छता, दुर्गंधीला प्राधान्य देण्यात येत आहे.

केवळ रस्त्याच्या कडेलाच नव्हे तर रहदारीच्या ठिकाणी, बसथांबे किंवा देवालयांशेजारीही ही मासेविक्री पोचली असून फोंडा तालुक्‍यात तर अंदाधुंदी माजली आहे. याप्रकरणी कुणीच लक्ष घालत नाही, त्यामुळे मत्स्यखवय्यांचे चोचले पुरवताना शाकाहारी लोकांना मात्र नाक मुठीत घेऊन जावे लागते. याप्रकरणी नियोजन करून संबंधित पंचायती किंवा सरकारी यंत्रणेने इतस्ततः माशांच्या टोपल्या ठेवून धंदा करणाऱ्यांना योग्य जागा द्यावी व ग्राहकांना तसेच विक्रेत्यालाही सोपे ठरेल, अशी कृती करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. 

कोरोना काळात वाढले मासे व्यावसायिक!

कोरोना काळात लॉकडाऊन झाल्याने अनेक धंद्यांवर आफत आली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार कमी झाले. त्यामुळे अर्ध्या दिवसाचा आणि झटपट पैसा कमावण्याचा धंदा म्हणून मासे विक्रीकडे पाहिले जाते. पहाटे ते दुपारपर्यंत ही मासेविक्री केल्यानंतर अर्धा दिवस मोकळा मिळत असल्याने त्यातच मासे विक्रीत उधारी नसल्याने हा धंदा आता बऱ्याच जणांनी स्विकारला आहे, मात्र त्यात कोणतेच नियोजन नसल्याने इतरांसाठी तो त्रासदायक ठरला आहे. विशेष म्हणजे फोंड्यातील मासळी मार्केट तर परप्रांतीयांच्या ताब्यात गेले आहे. या मासळी मार्केटमधील मूळ गोमंतकीय मासेविक्रेत्यांनी तर जागा भाड्याने दिल्याची चर्चा आहे.

धंदा करावाच, पण...!

मासेविक्रीचा धंदा करण्यासाठी कुणीही आडकाठी किंवा विरोध केलेला नाही. रोजगार नसल्याने लोक धंद्याच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळेच सध्या चांगली कमाई करून देणारा मासे विक्रीच्या व्यवसायाला लोक प्राधान्य देत आहेत. मात्र ही मासेविक्री भर रहदारीच्या ठिकाणी रस्त्यावर किंवा बसथांबे अथवा देवालयांच्या जागांवर होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रोजगार हा करायलाच हवा, पण तो इतरांना त्रासदायक ठरता कामा नये. त्यामुळे या धंद्यात नियोजन असावे, अशी मागणी होत 
आहे.
अपघातांचे सत्र सुरू...!

रस्त्याच्या कडेला मासेविक्री सुरू झाल्याने या ठिकाणी अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. मासे खरेदी करण्यासाठी वाहने अचानकपणे थांबवली जातात. त्यामुळे हे अपघात होत आहेत. त्यातच मासे खरेदीसाठी वाहनांची गर्दी होत असल्यानेही वाहतूक कोंडीसह जीवघेण्या अपघाताला निमंत्रण देण्यासारखे ठरले आहे. काही ठिकाणी तर यापूर्वी अपघात होऊन बळीही गेले आहेत, अशा धोकादायक ठिकाणच्या रस्त्यावर बिनधास्तपणे मासे विक्री केली जात आहे, आणि पंचायत किंवा पोलिसांना त्याचे काहीच पडलेले नाही. सरकारला या ठिकाणी पुन्हा जीवघेणा अपघात अपेक्षित आहे काय, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
 

कुर्टी- खांडेपार पंचायत क्षेत्रात अंदाधुंदी

फोंडा तालुक्‍यात बहुतांश पंचायतक्षेत्रात रस्त्याच्या कडेला ही मासेविक्री केली जाते. त्यातल्या त्यात कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रात तर अंदाधुंदी असून सर्वाधिक मासे विक्रेते या पंचायतक्षेत्रात जागा मिळेल तेथे मासे विकत असल्याने परिसर गलिच्छ व ओंगळवाणा ठरत आहे. पंचायतीने याप्रकरणी योग्य नियोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे. यासंबंधीचे एक निवेदनही पंचायतीला सादर करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. फोंडा तालुक्‍यातील सर्वच पंचायतक्षेत्रात अशाप्रकारची अंदाधुंदी सुरू आहे.
 

संबंधित बातम्या