मच्छीमारी ट्रॉलर परतले

Fishing net
Fishing net

पणजी

मच्छीमारी हंगाम संपत आला तसे मच्छीमारी ट्रॉलर धक्क्‍यावर परतू लागले आहेत. आज ट्रॉलरवरील मच्छीमारी जाळी खाली उतरवणे सुरू झाले आहे. ३१ मे पासून कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रात वादळी वातावरण असेल त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा यापूर्वीच हवामान खात्याने दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही १ जूनपासून सागरी, यांत्रिकी मासेमारीवरील बंदी अस्तित्वात येणार आहे. कोविड टाळेबंदीच्या काळात राज्यातील मासेमारी ट्रॉलरवरील अधिकाधिक कामगार आपल्या मूळ गावी निघून गेले. त्यामुळे जेमतेम सहाशे ट्रॉलर राज्यभरात सुरू होते. त्यातील सर्वच ट्रॉलर आता धक्क्यावर आले आहेत. त्या ट्रॉलरमधून जाळी उतरवली जात आहेत. नारळी पौर्णिमेच्या आधी त्या जाळ्यांची दुरुस्ती केली जाते. त्यासाठी किनारी भागात खास शेडस उभारलेल्या आहेत. यंदा कोविड टाळेबंदीच्या काळात मासेमारीसाठी सुरवातीला ट्रॉलर जात नव्हते, ते नंतर जाऊ लागले. त्यातच कामगार गावी जाण्यास निघाले त्यामुळे त्याचा फटका मासेमारीला बसला. हॉटेल्स बंद झाली त्यामुळे मासे विकत घेण्यासाठी मोठे ग्राहक राहिले नाहीत. त्यामुळे कसाबसा मासेमारीचा हंगाम यंदा सुरू होता, तोही आता संपुष्टात आला आहे.
सरकारने एका ठिकाणी मासे विक्री करण्यास बंदी घातली, केवळ फिरून मासे विक्री करण्यास परवानगी दिली. त्यामुळे फिरत्या स्टॉलवाल्यांचीही पंचाईत झाली होती. कोविड महामारी आटोक्यात ठेवण्यासाठी समाज अंतराच्या पालनाची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे एकेका ट्रॉलरवर मर्यादित कामगार पाठवता येत होते. त्याचा फटकाही मासेमारीला बसला आणि मासळी पकडण्याचे प्रमाण अलीकडे घटले होते. मडगावचा घाऊक मासळी बाजार बंद असल्याने हे या व्यवसायाचे उरलेसुरले कंबरडे यंदा मोडले आहे.

यंदाचा मासेमारी हंगाम कोणालाच लाभदायी ठरला नाही. कोविड महामारीमुळे टाळेबंदी झाली आणि जेमतेम नफ्यात चालणारा मासेमारीचा व्यवसाय तोट्यात गेला. राज्याबाहेरील कामगारांवर हा व्यवसाय आता अवलंबून आहे. आता गावाला गेलेले कामगार पुढील वर्षी येतील का हे व्यवसायापुढील मोठे आव्हान आहे. पावसाळ्यात देखभाल दुरुस्तीसाठीही यंदा कामगार उपलब्ध होणार नाहीत.
- जुझे फिलीप डिसोझा अध्यक्ष, गोवा बोट मालक संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com